Faf Du Plessis Reaction: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये 10 वा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 7 विकेट्सने विजय मिळवला. एखाद्या टीमचा होमग्राऊंडवर झालेला यंदाच्या सिझनमधील हा पहिलाच पराभव होता. दरम्यान रॉयल चॅलेंजर बंगळूरचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने यावेळी पीचला पराभवासाठी जबाबदार धरलं आहे.
सामन्यानंतर फाफ डु प्लेसिस म्हणाला, "पहिल्या डावात काही चेंडू थांबून येत होता. पण लक्ष्याचा पाठलाग करताना खेळपट्टी चांगली झाली. हे काहीसं विचित्र होतं. पहिल्या डावात आम्हाला वाटलं की, ही दोन-गतींची विकेट आहे. मात्र ज्यावेळी गोलंदाजी केली तेव्हा बॅक ऑफ द लेंथ गोलंदाजी करताना संघर्ष करावा लागला. आम्हाला वाटलं की ही, चांगली धावसंख्या आहे. याठिकाणी थोडंसं दव पडलं. पहिल्या डावात आम्ही ज्या प्रकारे फलंदाजी केली ते पाहता विराटला बॉल मारायला धडपडत करावी लागत होती. याचं कारण तिथे गतीची कमतरता होती."
पॉवरप्लेमधील खराब गोलंदाजीबद्दल तो म्हणाला, "नरीन आणि सॉल्ट यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली तेव्हा त्यांनी आमच्या गोलंदाजांवर दबाव आणला. त्याने उत्तम फटके खेळले आणि गेमला दूर नेले. नरीनसोबत तुम्ही स्पिनचा वापर करू शकत नाही. तुम्हाला त्याच्याविरुद्ध वेगाचा वापर करावा लागेल. सॉल्ट आणि तो ज्या पद्धतीने खेळला त्याच्यासाठी हा एक चांगला सामना होता."
या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केकेआरला जिंकण्यासाठी 183 रन लक्ष्य दिलं होतं. या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत 83 रन्सची नाबाद खेळी केली. मात्र त्याची खेळी व्यर्थ गेली. लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरीन आणि फिल सॉल्टने कोलकाता नाईट रायडर्सला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी 39 बॉल्समध्ये 86 रन्सची पार्टनरशिप केली. सॉल्ट-नरीननंतर व्यंकटेश अय्यरची जादू पाहायला मिळाली. अखेर केकेआरने 7 विकेट्सने हा सामना जिंकला.