माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन झालं आहे. 

Updated: Aug 15, 2018, 11:21 PM IST
माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन title=

मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन झालं आहे. जसलोक रुग्णालयात वाडेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित वाडेकर हे ७७ वर्षांचे होते. अजित वाडेकर यांच्याच नेतृत्वामध्ये भारतानं परदेशामध्ये पहिली टेस्ट सीरिज जिंकली होती. अजित वाडेकर कर्णधार असताना भारतानं १९७१ साली वेस्ट इंडिजमध्ये आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती.

१ एप्रिल १९४१ रोजी अजित वाडेकर यांचा जन्म झाला होता. १९५८ मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. १९६६ साली वाडेकरांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केलं. अजित वाडेकर यांना १९६७ साली अर्जुन पुरस्कारानं आणि १९७२ साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं गेलं.

अजित वाडेकर यांची कारकिर्द 

अजित वाडेकर यांनी ३७ मॅच आणि ७१ इनिंगमध्ये ३१.०७ च्या सरासरीनं २,११३ रन केले होते. यामध्ये एक शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वाडेकर यांनी २३७ मॅचमध्ये ४७.०३ च्या सरासरीनं १५,३८० रन केल्या होत्या. यामध्ये ३६ शतकं आणि ८४ अर्धशतकांचा समावेश होता. 

१९५८-५९ मध्ये वाडेकर यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं असलं तरी त्यांना ८ वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी निवडलं गेलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खोऱ्यानं रन केल्यानंतर अखेर १९६६-६७ मध्ये त्यांची भारतीय टीममध्ये निवड झाली. ७ वर्षांसाठी वाडेकर भारतीय टीमकडून खेळले. भारतीय क्रिकेटमधल्या तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक म्हणून वाडेकर यांचं नाव घेतलं जातं. तसंच वाडेकर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातले स्लिपमधले सर्वोत्तम फिल्डर होते. 

टायगर पतौडी यांच्यानंतर जानेवारी १९७१ मध्ये अजित वाडेकर यांच्याकडे भारतीय टीमचं कर्णधारपद देण्यात आलं. यानंतर १९७२-७३ मध्ये इंग्लंड भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतरही वाडेकर यांच्या नेतृत्वात विजय झाला. पण १९७४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये मात्र वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताचा दारूण पराभव झाला. या सीरिजमधल्या तिन्ही टेस्ट मॅच भारत हारला. यातल्या लॉर्ड्सवर झालेल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीम ४२ रनवर ऑल आऊट झाली. टेस्ट इतिहासातला भारताचा हा आजही सगळ्यात कमी स्कोअर आहे. ४२ रनवर ऑल आऊट झाल्यामुळे या सीरिजचा उल्लेख समर ऑफ ४२ असाही करण्यात आला. इंग्लंडमधल्या या निराशाजनक कामगिरीनंतर अजित वाडेकर यांना भारताकडून पुन्हा टेस्ट क्रिकेट खेळता आलं नाही.