'तुम्ही रिझवानला मैदानात नमाज...,' ICC कडे तक्रार करणाऱ्या PCB ला पाकिस्तानी खेळाडूनेच सुनावलं

अहमदाबादमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात झालेल्या घोषणाबाजींप्रकरणी पाकिस्तान क्रिके बोर्डाने आयसीसीकडे तक्रार केली आहे. पण यावरुन पाकिस्तानच्याच माजी खेळाडूने बोर्डाला खडे बोल सुनावले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Oct 20, 2023, 04:13 PM IST
'तुम्ही रिझवानला मैदानात नमाज...,' ICC कडे तक्रार करणाऱ्या PCB ला पाकिस्तानी खेळाडूनेच सुनावलं title=

अहमदाबादमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात प्रेक्षकांनी पाकिस्तानी खेळाडूंसह गैरवर्तन केल्याचा आरोप करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रार केली आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांनी घोषणाबाजी केल्याचा दाखला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आला आहे. यानंतर त्यांच्यावर टीका होत असून, आयसीसीनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यादरम्यान पाकिस्तानच्या माजी खेळाडूनेही बोर्डाला खडे बोल सुनावले आहेत. 

पीसीबीने पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यास होणारा विलंब आणि सध्या सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक 2023 साठी पाकिस्तान चाहत्यांसाठी व्हिसा धोरण नसल्याबद्दल आयसीसीकडे औपचारिक निषेध नोंदवला आहे. यावरुन पाकिस्तानचा माजी खेळाडू दिनेश कनेरियाने तुम्ही फक्त इतरांच्या चुका शोधा असं म्हणत टोला लगावला आहे. दिनेश कनेरिया हा पाकिस्तान संघाकडून खेळलेल्या काही हिंदू खेळाडूंपैकी आहे. 

दिनेश कनेरियाने क्रिकेट बोर्डाला अनेक प्रश्न विचारले आहेत. "पाकिस्तानी पत्रकार झैनब अब्बासला भारत आणि हिंदूंविरोधात कमेंट करण्यास कोणी सांगितलं? मिकी आर्थर यांना हा आयसीसी नव्हे तर बीसीसीआयचा कार्यक्रम आहे असं बोलण्यास कोणी सांगितलं? रिझवानला मैदानात नमाज पठण करण्यास कोणी सांगितलं? इतरांमध्ये चुका शोधू नका," अशी पोस्ट दिनशे कनेरियाने एक्सवर शेअर केली आहे. 

पीसीबीने एक्सवर जारी केलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, "पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसामध्ये होणारा विलंब आणि पाकिस्तानी चाहत्यांसाठी व्हिसा धोरण नसल्याबद्दल आयसीसीकडे आणखी एक औपचारिक निषेध नोंदवला आहे."

पीसीबीने 14 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाला लक्ष्य करत केलेल्या गैरवर्तवुणीकीची तक्रार देखील दाखल केली आहे अशी माहिती दिली आहे. 

मिकी आर्थर यांच्या विधानावरुनही वाद

पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक मिकी आर्थर यांच्या विधानामुळेही वाद निर्माण झाला आहे. "हे पाहा, खरं सांगायचं तर आजचा सामना हा अजिबात आयसीसीने आयोजित केलेला वाटला नाही. मी खोटं सांगणार नाही. ही द्विपक्षीय मालिका वाटत होती. बीसीसीआयने याचं आयोजन केल्यासारखं वाटत होतं. मला मायक्रोफोनवरुन एकदाही 'दिल दिल पाकिस्तान' ऐकायला मिळालं नाही," असं मिकी आर्थर म्हणाले. 

"या गोष्टी नक्कीच फरक पाडतात. पण मी हे पराभवाचं कारण म्हणून वापरणार नाही. हा प्रश्न तो क्षण जगण्याचा, पुढील चेंडूचा आणि तुम्ही भारतीय संघ, भारतीय खेळाडूंना कसे सामोरे जाता याचा होता," असं मिकी आर्थर यांनी सांगितलं.