डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्सला रामराम? इन्स्टाग्राम पोस्टमुळे वॉर्नरसह फॅन्सही भावूक

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे वॉर्नर हैद्राबादला निरोप देत असण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Updated: Oct 9, 2021, 07:10 AM IST
डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्सला रामराम? इन्स्टाग्राम पोस्टमुळे वॉर्नरसह फॅन्सही भावूक title=

मुंबई : यंदाची आयपीएल ऑस्ट्रेलियाचा महान ओपनर डेव्हिड वॉर्नरसाठी काही खास राहिली नाही. खराब फॉर्ममुळे त्याला सनरायझर्स हैदराबादच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकलं नाही. दरम्यान शुक्रवारी डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे वॉर्नर हैद्राबादला निरोप देत असण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय, 'सर्व आठवणींबद्दल धन्यवाद. आमच्या टीमला 100% पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. माझ्यासाठी दाखवलेल्या सर्व समर्थनाबद्दल आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. हा एक अद्भुत प्रवास होता, माझं कुटुंब आणि मी तुम्हाला सर्वांना नक्कीच मिस करू.

खराब फॉर्ममध्ये होता वॉर्नर

जेव्हा आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू झाला, तेव्हापासून डेव्हिड वॉर्नरची फलंदाजी काही फारशी चांगली नव्हती. तो केवळ दोन सामने खेळला आणि त्यात 0, 2 असे रन्स केले. यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली नाही. वॉर्नर बाहेर बसल्यावर चाहत्यांच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याच्या संघाच्या सामन्यांदरम्यान, वॉर्नर स्टँडमध्ये मात्र बसलेला दिसला.

सनरायझर्ससोबत वॉर्नरचा प्रवास

डेव्हिड वॉर्नरचं नाव मॉडर्न टाइम ग्रेट प्लेयर्समध्ये घेतलं जातं. त्याने आयपीएलमध्येही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. 2014 ते 2020 पर्यंत, डेव्हिड वॉर्नरने प्रत्येक हंगामात 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. फक्त 2021 च्या हंगामात, डेव्हिड वॉर्नर 8 सामन्यांत फक्त 195 रन्स करू शकला. अशा परिस्थितीत, हैदराबाद संघासाठी डेव्हिड वॉर्नरचा हा शेवटचा सिझन असल्याची चिन्हं बऱ्याच काळापासून होती.

नव्या टीममध्ये जाणार वॉर्नर?

पुढच्या आयपीएलमध्ये दोन टीम सामील होणार आहेत. त्यानंतर सर्वात मोठा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत जर डेव्हिड वॉर्नरला आयपीएल खेळायचं असेल तर त्याला कोणत्याही नवीन संघात जाण्याची संधी आहे. डेव्हिड वॉर्नरचा आयपीएलमध्ये विक्रम आहे आणि त्याच्या उत्कृष्ट कर्णधारपदाच्या जोरावर कोणताही संघ त्याला मोठ्या किमतीला खरेदी करू शकतो.