'कॉफी विथ करण' वाद, हार्दिक पांड्या लोकपाल जैनना भेटला

कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती.

Updated: Apr 9, 2019, 11:10 PM IST
'कॉफी विथ करण' वाद, हार्दिक पांड्या लोकपाल जैनना भेटला title=

मुंबई : कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. या वक्तव्याप्रकरणी हार्दिक पांड्याने बीसीसीआयचे लोकपाल डी.के.जैन यांची भेट घेतली आहे. तर केएल राहुल बुधवारी जैन यांची भेट घेईल. हार्दिक पांड्या हा सध्या आयपीएलमध्ये मुंबईकडून तर केएल राहुल पंजाबकडून खेळत आहे.

सोमवारी वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड होणार आहे. याआधी लोकपाल या दोघांच्या चौकशीचा रिपोर्ट देतील, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

'या प्रकरणाच्या चौकशीसाठी वेळेची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. पण सोमवारी टीम निवडीच्या आधी लोकपालचा रिपोर्ट येईल अशी अपेक्षा आहे. लोकपाल काय निर्णय देणार हे आम्हाला माहिती नाही, पण कोणतीही शिक्षा गुन्ह्यापेक्षा जास्त असता कामा नये,' असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

कॉफी विथ करण या शोमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे वाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने निलंबन केलं होतं. ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडून हार्दिक आणि राहुलला भारतात परतावं लागलं होतं. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण लोकपालची नियुक्ती होत नसल्यामुळे दोघांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. आता लोकपालची नियुक्ती झाल्यामुळे या दोघांना पुन्हा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी सार्वजनिकरित्या माफीही मागीतली आहे.