चॅम्पियन्स ट्रॉफी बंद, आयसीसीची महत्त्वाची घोषणा

चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीनं मोठी घोषणा केली आहे. ५० ओव्हरची चॅम्पियन्स ट्रॉफी आता बंद झाली आहे.

Updated: Apr 26, 2018, 10:30 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी बंद, आयसीसीची महत्त्वाची घोषणा  title=

कोलकाता : चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीनं मोठी घोषणा केली आहे. ५० ओव्हरची चॅम्पियन्स ट्रॉफी आता बंद झाली आहे. २०२१ साली भारतामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार होती. पण आता त्याऐवजी आता भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. आठ टीममध्ये होणाऱ्या या स्पर्धेबाबत आधीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात होते. आयसीसीनं अखेर कोलकात्यामध्ये झालेल्या ५ दिवसांच्या बैठकीमध्ये सर्वसंमतीनं चॅम्पियन्स ट्रॉफी बंद करण्याचा निर्णय घेतला. याऐवजी आता भारतात २०२१ साली टी-20 वर्ल्ड कप होईल. या स्पर्धेत १६ टीम सहभागी होतील.

२०२० मध्येही टी-20 वर्ल्ड कप

आयसीसीच्या या निर्णयामुळे आता लागोपाठ २ वर्ष टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. खेळाला वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आयसीसीनं सांगितलं.

२०१९ वर्ल्ड कपचीही घोषणा

२०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीनं जाहीर केलं आहे. २०१९ वर्ल्ड कप ३० मे ते १५ जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहे. ३० मे रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मॅचनं २०१९ वर्ल्ड कपला सुरुवात होईल. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान या १० देशांमध्ये २०१९ चा वर्ल्ड कप होईल. तसंच १९९२ साली खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कपनुसार प्रत्येक टीम एकमेकांविरोधात एक सामना खेळेल. यानंतरच्या टॉप ४ टीम सेमी फायनलमध्ये एकमेकांना भिडतील. ५ जूनला भारत त्यांचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.