Aus vs Pak : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा टप्प्यात कार्यक्रम, पॉईंटटेबलमध्ये मोठी झेप

ICC World Cup Australia vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला धुळ चारत स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर पाकिस्तान संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला.

राजीव कासले | Updated: Oct 20, 2023, 10:36 PM IST
Aus vs Pak : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानचा टप्प्यात कार्यक्रम, पॉईंटटेबलमध्ये मोठी झेप title=

ICC World Cup Australia vs Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 18 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दरम्यान खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 62 धावांनी धुळ चारली (Australia beat Pakistan). ऑस्ट्रेलियाचा चार सामन्यातील हा दुसरा विजय ठरला आहे. तर पाकिस्तानचा चार सामन्यातील हा दुसरा पराभव आहे. पहिली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 367 धावांचा डोंगर रचला. वॉर्नर आणि मार्शने पहिल्या विकेटसाठी 259 धावांची पार्टनरशिप करत रेकॉर्ड रचला. याला उत्तर देताना पाकिस्तानचा संघ 305 धावांवर ऑलआऊट झाला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ पॉईंटटेबलमध्ये (Pointtable) चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर चौथ्या स्थानावर असलेला पाकिस्तानचा संघ पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. 

वॉर्नर-मार्शची रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप
बंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा सामना खेळवण्यात आला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने पहिल्याच षटकापासून पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली. सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श जोडीने पहिल्या विकेटसाठी तब्बल 259 धावांची पार्टनरशिप केली. विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाची पहिल्या विकेटसाठीची ही विक्रमी पार्टनरशीप ठरली.  दोघांनीही शतक झळकावलं. 

डेव्हिड वॉर्नरने  ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक163 धावा केल्या. यात त्याने 9 षटकार आणि 14 चौकारांची आतषबाजी केली. तर मिचेल मार्शने 9 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 121 धावा फटकावल्या. पण ही जोडी बाद झाली आणि ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली, सुरुवातीला चारशे धावांचा टप्पा गाठणार असं वाटत असताना ऑस्ट्रेलियाला 9 विकेट गमावत 367 धावा करता आल्या. 

शाहिन आफ्रिदीची भेदक गोलंदाजी
पाकिस्तानतर्फे प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, शाहिन आफ्रिदीने 10 षटकात 54 धावा देत 5 विकेट घेतल्या. विश्वचषकात पाच विकेट घेण्याची ही त्याची दुसरी वेळ ठरलीय. याआधी 2019 च्या विश्वचषकात शाहिनने बांगलादेशविरुद्ध 35 धावांमध्ये सहा विकेट घेतल्या होत्या. विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी करणारा शाहिन आफ्रिदी हा पाकिस्तानचा पहिला गोलंदाज ठरला आहे. 

पाकिस्तानचं ढिसाळ क्षेत्ररक्षण
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मदत मिळाली ती पाकिस्तानच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाची. 163 धावा करणारा वॉर्नर 10 धावांवर खेळत असताना शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर उसामा मीरने त्याचा सोपा झेल सोडला. हाच झेल पाकिस्तानला महागात पडला. त्यानंतर अब्दुल्ला शफीकनेही वॉर्नरला जीवदान दिलं. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) स्लिपमध्ये स्टिव्ह स्मिथचा सोपा झेल ड्रॉप केला.

पाकिस्तानतर्फे अब्दुल्ला शफीक 64 तर इमाम उल हकने 70 धावा केल्या. कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. बाबर 18 धावा करुन बाद झाला.