World Cup सुरु असतानाच मोठी घोषणा! संजू सॅमसनची अचानक कर्णधारपदी नियुक्ती

Sanju Samson Will Lead Team: भारतामधील सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आज अहमदाबादमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागलेलं असतानाच एक नवीन बातमी समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 14, 2023, 09:27 AM IST
World Cup सुरु असतानाच मोठी घोषणा! संजू सॅमसनची अचानक कर्णधारपदी नियुक्ती title=
संजू सॅमसनवर सोपवण्यात आली मोठी जबाबदारी

Sanju Samson Will Lead Team: भारत आणि पाकिस्तानदरम्यान वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये आज गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या हाय व्होल्टेज सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. या सामन्यासाठी लाखो प्रेक्षक प्रत्यक्षात उपस्थित राहणार आहेत. या सामन्याबद्दल उत्सुकता असतानाच दुसरीकडे वर्ल्ड कपच्या भारतीय संघामध्ये समावेश नसलेल्या संजू सॅमसनवर मोठी जबाबादरी सोपवण्यात आली आहे. संजू सॅमसनला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या टी-20 स्पर्धेसाठी केरळ संघाचं कर्णधार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. ही स्पर्धा सोमवारपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून 6 नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. भारतामधील वेगवेगळ्या मैदानांवर हे सामने खेळवले जाणार आहेत.

राष्ट्रीय संघाचं लक्ष डोळ्यासमोर असेल

केरळचा संघ ब गटामध्ये असून त्यांचा पहिला सामना हिमाचल विरुद्ध मुंबईत होणार आहे. साखळी फेरीमध्ये केरळ आणि हिमाचलबरोबरच ब गटामध्ये सिक्कीम, आसाम, बिहार, छत्तीसगढ, ओडिशा, सर्व्हिसेस आणि चंदीगढ हे संघ असतील. या स्पर्धेमध्ये आपली छाप पाडण्याचा संजू सॅमसनचा मानस असेल. राष्ट्रीय संघाच्या निवडकर्त्यांनी आगामी मालिकांसाठी आपला विचार करावा यासाठी संजू सॅमसन या स्पर्धेत संपूर्ण ताकदीनिशी उतरेल असं सांगितलं जात आहे. 

इन्टाग्रामवरुन केलेली पोस्ट

काही दिवसांपूर्वीच संजू सॅमसनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भारतीय संघ वर्ल्ड कपचा सराव करतानाचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये सराव सुरु असलेल्या ठिकाणी एका भिंतीवर संजूचं चित्र रेखाटलेलं होतं. त्यामुळेच त्याने आपण भारतीय संघाबरोबर आहोत अशी कॅप्शन देत हा फोटो शेअर केला होता.

हा फिरकीपटू ठरणार हुकुमी एक्का

यंदा केरळच्या संघामध्ये श्रेयस गोपाळ या अष्टपैलू खेळाडूचा समावेश करण्यात आल्याने संघाला बळकटी मिळाली आहे. आधीच्या पर्वात श्रेयस कर्नाटकच्या संघातून खेळला होता. श्रेयससारख्या फिरकीपटूला संघात स्थान दिल्याने तो जलज सक्सेनाबरोबर संघाची गोलंदाजी अधिक सक्षम करण्यासाठी नक्कीच मोलाची भूमिका बजावेल असं सांगितलं जात आहे. जलज सक्सेना हा मागील रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. जलजने या स्पर्धेत तब्बल 50 विकेट्स घेतलेल्या.

उपकर्णधार आणि प्रशिक्षक

केरळ संघाचं उपकर्णधारपद रोहन कुन्नम्मलकडे सोपवण्यात आलं आहे. तर तामिळनाडूचे माजी क्रिकेटपटू एम वेंकटरमण्णा हे केरळ संघाचे प्रशिक्षक असतील.

कसा आहे केरळचा संघ

संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), रोहन कुन्नम्मल (उपकर्णधार), श्रेयस गोपाल, जलज सक्सेना, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, विष्णू विनोद, अब्दुल बासित, सिजोमन जोसेफ, वैशाख चंद्रन, बासिल थम्पी, केएम आसिफ, विनोद कुमार, मनू. कृष्णन, वरुण नयनर, एम. अजनास, पी.के. मिथुन, सलमान निसार.