IND VS ENG: भारतीयचा दणदणीत विजय, WTCच्या फायनलचा मार्ग मोकळा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे.

Updated: Mar 6, 2021, 04:30 PM IST
IND VS ENG: भारतीयचा दणदणीत विजय, WTCच्या फायनलचा मार्ग मोकळा title=

अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवला आहे. 25 धावांनी भारतीय संघानं चौथ्या सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला. अहमदाबादमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंड संघाला जेरीस आणलं. दुसऱ्या डावात केवळ 135 धावा करण्यात इंग्लंडच्या संघाला यश मिळालं आहे. 

अक्षर पटेल आणि आर अश्विनचा तुफान गोलंदाजीनं इंग्लंडच्या बड्या फलंदाजांची दांडी गुल झाली आणि भारतीय संघानं मालिका आपल्या खिशात घातली. भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 3-1 ने विजय मिळवला आहे. 

अहमदाबादमधील शेवटची कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाने एकूण 520 गुण जिंकले आहेत आणि 72.2 टक्के गुण जिंकले आहेत. अशाप्रकारे, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम पॉईंट टेबलमध्ये भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. हा अंतिम सामना न्यूझिलंड विरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडने यापूर्वीच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 70% पॉईंटसह त्यांचे स्थान निश्चित केले होते. 

या अंतिम टप्प्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला असून अहमदाबादच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या पराभवाची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा हवेतच विरली आणि भारतीय संघानं या मालिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे.