IND vs WI: दुसऱ्या ODI मधील पराभवानंतर कर्णधार पांड्या फलंदाजांवर नाराज; म्हणाला 'मी काही ससा नाहीये....'

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. हार्दिक पांड्याने फलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरलं.   

शिवराज यादव | Updated: Jul 30, 2023, 10:10 AM IST
IND vs WI: दुसऱ्या ODI मधील पराभवानंतर कर्णधार पांड्या फलंदाजांवर नाराज; म्हणाला 'मी काही ससा नाहीये....' title=

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. शनिवारी ब्रिजटाउनमधील केंसिंग्टन ओव्हल मैदानात खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने फक्त 181 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजने 37 ओव्हर्समध्येच हा सामना जिंकला. आता दोन्ही संघ 1 ऑगस्टला त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडिअममध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहेत. 

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट शर्मा यांना विश्रांती देण्यात आली होती. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. दरम्यान, पराभवानंतर हार्दिक पांड्या फार नाराज दिसत होतो. त्याने खराब फलंदाजी केल्याने आमचा पराभव झाल्याचं सांगितलं. 

हार्दिक पांड्याने सांगितलं की, "आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी करणं अपेक्षित होतं, तशी फलंदाजी केली नाही. पहिल्या डावाच्या तुलनेत विकेट फार चांगली झाली. आम्ही निराश आहोत, पण फार काही शिकण्याची संधीही मिळाली आहे. ज्याप्रकारे आघाडीचे फलंदाज, खासकरुन इशांत शर्मा याने फलंदाजी केली ते फार महत्त्वाचं आहे. शार्दुल ठाकूरने आपल्या गोलंदाजीने संघात पुनरागमन केलं आहे. होप आणि कार्टी यांनी चांगली फलंदाजी करत विजय मिळवला". 

"मी कासव आहे, ससा नाही"

हार्दिक पांड्याने पुढे सांगितलं की, "मला जास्तीत जास्त गोलंदाजी करावी लागेल. वर्ल्डकपसाठी मला वर्कलोड वाढवावा लागले. मी यावेळी ससा नाही, तर कासव आहे. वर्ल्डकपपर्यंत सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे. तिसरा सामना खेळाडूंसह प्रेक्षकांसाठीही रोमांचक असेल".

भारतीय संघ 181 वर ऑल आऊट

भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात फार निराशाजनक कामगिरी केली. संपूर्ण संघ 40.5 ओव्हर्समध्येच 181 धावांवर बाद झाला. एकावेळी संघ एकही विकेट न गमावता 90 धावांवर होता. पण नंतर मात्र सगळा संघ ढेपाळला. भारताकडून इशान किशन (55), शुभमन गिल (34), सूर्यकुमार यादव (24), शार्दुल ठाकुर (16) आणि रवींद्र जडेजा (10) फक्त दोन अंकी धावा करु शकले. वेस़्ट इंडिजकडून गुडाकेश मोटी आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. अल्जारी जोसेफला दोन, तर यानिक कारिया आणि जेडन सील्स यांनी एक-एक विकेट मिळाला. 

भारताने 182 धावांचं आव्हान दिल्यानंतर वेस्ट इंडिजने अत्यंत सहजपणे हे टार्गेट पूर्ण केलं. होपने 80 चेंडूंचा सामना करत नाबाद 63 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर दुसरीकडे किसी कार्टीने 4 चौकारांच्या मदतीने 65 चेंडूंवर नाबाद 48 धावा केल्या. किसी कार्टी आणि होप यांनी 91 धावांची भागीदारी केली. दरम्यान, या पराभवासह भारताची सलग सामने जिंकण्याची घोदडौद थांबली आहे. या सामन्याआधी भारताने सलग 9 सामने जिंकले आहेत.