Video: क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११विरुद्ध ५ भारतीयांची अर्धशतकं

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या एकमेव सराव सामन्यामध्ये भारतीय बॅट्समननी शानदार कामगिरी केली आहे.

Updated: Nov 29, 2018, 07:55 PM IST
Video: क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११विरुद्ध ५ भारतीयांची अर्धशतकं title=

सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या एकमेव सराव सामन्यामध्ये भारतीय बॅट्समननी शानदार कामगिरी केली आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंड(एससीजी)वर सुरु असलेल्या या मॅचमध्ये पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतकं केली आहेत. या तिघांच्या अर्धशतकामुळे या सराव सामन्यात भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

भारतीय टीमची खराब सुरुवात

या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया-११ चा कर्णधार सॅम व्हाईटमॅननं टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंगला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉसोबत बॅटिंगला आलेला केएल राहुल सहाव्या ओव्हरमध्ये कोलमॅनच्या ओव्हरला मॅक्स ब्रायंटला कॅच देऊन आऊट झाला. राहुल आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोअर फक्त १६ रन होता. राहुलनं १८ बॉलमध्ये ११ रन केले.

शॉचं अर्धशतक

राहुल आऊट झाल्यानंतर पृथ्वी शॉनं भारतीय इनिंगला आकार द्यायला सुरुवात केली. अर्धशतक लगावून शॉनं त्याचं पहिल्या टेस्ट मॅचमधलं स्थान आणखी मजबूत केलं. पृथ्वी शॉनं ६९ बॉलमध्ये ११ फोरच्या मदतीनं ६६ रन केले. पृथ्वी शॉला लेग स्पिनर डॅनियल फॉलिन्सनं बोल्ड केलं. फॉलिन्सच्या बॉलिंगवर पृथ्वी शॉनं स्विप मारण्याचा प्रयत्न केला यामध्येच त्याला विकेट गमवावी लागली.

शॉ आऊट झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारानं भारतीय इनिंग सांभाळली. पुजारानं ३८व्या ओव्हरमध्ये ८३ बॉल खेळून अर्धशतक पूर्ण केलं. पुजारा ३९व्या ओव्हरमध्ये ८९ बॉलमध्ये ५४ रन करून आऊट झाला. पुजारानं इनिंगमध्ये एकूण ६ फोर मारले. पुजाराला ल्यूक रॉबिन्सनं आऊट केलं. पुजारा आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोअर १६९/३ एवढा होता.

विराट कोहलीचंही अर्धशतक

पुजारानंतर कर्णधार विराट कोहलीनंही त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. ८७ बॉलवर ६४ रन करून विराट कोहली आऊट झाला. विराटच्या खेळीमध्ये ७ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. हार्डीच्या बॉलिंगवर विराटनं त्यालाच कॅच दिला.

विराट कोहलीनंतर बॅटिंगला आलेल्या अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीनंही अर्धशतकं केली. १२३ बॉलमध्ये ५६ रन करून अजिंक्य रहाणे रिटायर्ड हर्ट झाला. तर हनुमा विहारीनं ८८ बॉलमध्ये ५३ रन केले. सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला रोहित शर्मा ५५ बॉलमध्ये ४० रन करून आऊट झाला.

पहिल्या इनिंगमध्ये भारतीय टीम ३५८ रनवर ऑल आऊट झाली. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया-११ चा स्कोअर २४/० एवढा होता. या चार दिवसांच्या सराव सामन्यानंतर ६ डिसेंबरपासून पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. ४ टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली टेस्ट मॅच ऍडलेडमध्ये खेळवली जाईल.