INDvsAUS:कोहलीचा ऑस्ट्रेलियाला इशारा, प्रत्युत्तर द्यायला तयार

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनबरोबरच एक आक्रमक खेळाडूही आहे.

Updated: Nov 20, 2018, 08:31 PM IST
INDvsAUS:कोहलीचा ऑस्ट्रेलियाला इशारा, प्रत्युत्तर द्यायला तयार title=

ब्रिस्बेन : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनबरोबरच एक आक्रमक खेळाडूही आहे. कोहलीच्या आक्रमकपणावर त्याचे काही चाहते फिदा होतात तर काहींना त्याचं हेच वागणं खटकतं. विराट कोहलीनं मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपण असेच आक्रमक राहू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे. त्याआधी मंगळवारी विराटनं पत्रकार परिषद घेतली. प्रत्येकासाठी आक्रमकतेची व्याख्या वेगळी असते. माझ्यासाठी आक्रमकतेची व्याख्या म्हणजे जिंकण्याची महत्त्वाकांक्षा आहे. माझ्या टीमसाठी ११० टक्के योगदान द्यायचं ही माझी महत्त्वाकांक्षा असल्याचं विराट म्हणाला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या स्लेजिंगमध्ये सहभागी होणार नाही, असं विराट म्हणाला होता. यावरून ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सनं विराटवर निशाणा साधला. मला विराट कोहलीवर विश्वास नाही. स्लेजिंग करणार नाही असं विराटनं माध्यमांना सांगितल्याचं मी ऐकलं. पण त्यानं जर असं केलं तर मला आश्चर्य वाटेल, असं वक्तव्य पॅट कमिन्सनं केलं आहे.

विराट हा जबरदस्त प्रतिस्पर्धी आहे आणि त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया पॅट कमिन्सनं दिल्याचं वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डनं दिलं आहे. कोणीही उचकवलं नाही तरी मी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करू शकतो. मला वैयक्तिकदृष्ट्या अशा गोष्टींची आवश्यकता वाटत नाही. मला माझ्या क्षमेतवर पूर्ण विश्वास आहे, असं कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी म्हणाला होता.

पहिल्या टी-२०साठी भारतीय टीमची घोषणा

पहिल्या टी-२० साठी भारतीय टीमची १२ खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. १६ खेळाडूंमधल्या भारतीय टीममध्ये श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वॉशिंगटन सुंदर आणि उमेश यादवला पहिल्या १२ खेळाडूंमध्ये समाविष्ट केलं गेलेलं नाही.

भारतीय टीम : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, युजवेंद्र चहल