INDvsENG WOMEN : पहिल्या टी-२० मध्ये भारताचा पराभव

भारताच्या पहिल्या चार खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.

Updated: Mar 4, 2019, 02:35 PM IST
INDvsENG WOMEN : पहिल्या टी-२० मध्ये भारताचा पराभव title=

गुवाहाटी : भारताचा पहिल्या टी-२० मध्ये ४१ रन्सने पराभव झाला आहे. इंग्लंडने ३ सामन्यांच्या या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी १६१ रन्सचं आव्हान दिलं होतं. भारताला याबदल्यात ६ विकेट गमावून फक्त ११९ रन करता आले. भारताकडून शिखा पांडेने नॉटआऊट २३ रन तर दिप्ती शर्माने नॉटआऊट २२ रन केले. 

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताने फक्त २३ रनवर तीन विकेट गमावल्या. पहिल्या विकेटसाठी हर्लिन देओल आणि कॅप्टन स्मृती मंधाना यांनी २१ रन्सची भागीदारी झाली.  भारताला पहिला झटका २१ रनवर लागला. हर्लिन देओल ८ रनवर आऊट झाली. यानंतर चौथ्या ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर भारताने सलग २ विकेट गमावल्या.

मागील अनेक सीरिजपासून सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत असलेल्या स्मृती मंधानाला आजच्या सामन्यात काही विशेष कामगिरी करता आली नाही. स्मृती मंधाना अवघ्या २ रन करुन आऊट झाली. यानंतर लगेच पुढील बॉलवर जेमिमा रॉड्रिग्ज २ रनवर तंबूत परतली. भारताच्या पहिल्या चार खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.  भारताच्या मधल्या फळीतील खेळाडूंना चांगली खेळी करता आली नाही. इंगलडकडून कॅथरिन ब्रंट आणि लिन्से स्मिथ या दोघींनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर केट क्रॉस आणि अन्या श्रुबसोल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

याआधी भारताने टॉस जिंकत आधी इंग्लंडला बॅटींग करण्यासाठी आमंत्रित केले होते. इंग्लंडने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी  डॅनिएल वॅट आणि टॅमी ब्युमाट या दोघांमध्ये ८९ रन्सची पार्टनरशिप झाली. ही जोडी फोडायला शिखा पांडेला यश आले. यानंतर राधा यादवने नताली शिव्हरला बाहेरचा रस्ता दाखवला. इंग्लंडकडून टॅमी ब्युमाटने सर्वाधिक ६२ रन केले. इंग्लंडने २० ओव्हरमध्ये १६० रन केले. भारताकडून राधा यादवने २ तर शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी १ विकेट घेतली.