भारतीय क्रिकेटविश्वाला धक्का! दिग्गज क्रिकेटपटूचं निधन

भारताचे सर्वात जुने कसोटी क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड (Dattajirao Gaekwad) यांचं निधन झालं आहे. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाचं वृत्त समजल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 13, 2024, 04:34 PM IST
भारतीय क्रिकेटविश्वाला धक्का! दिग्गज क्रिकेटपटूचं निधन title=

भारतीय क्रिकेटविश्वाला आज मोठा धक्का बसला आहे. भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि हयात असणारे सर्वात जुने क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन झालं आहे.  वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बडोदा रुग्णालयात वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. इरफान पठाणसह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 

दत्ताजीराव गायकवाड हे माजी क्रिकेटर आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे वडील आहेत. त्यांनी 1952 ते 1961 दरम्यान 11 कसोटी सामने खेळले. 1959 च्या इंग्लंड दौऱ्यात ते भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यानी चार सामन्यात भारताचं नेतृत्व केलं. उजव्या हाताने फलंदाजी करणारे दत्ताजीराव गायकवाड यांनी आपल्या कारकिर्दीत 18.42 च्या सरासरीने 350 कसोटी धावा केल्या. 1959 मध्ये नवी दिल्ली येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी आपल्या सर्वाधिक 52 धावांची नोंद केली होती. 

दत्ताजीराव गायकवाड बचावासाठी आणि ड्राईव्हसाठी ओळखले जात होते. एक अष्टपैलू क्षेत्ररक्षक म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. स्वातंत्र्यानंतर भारताच्या पहिल्या इंग्लंड दौऱ्यात 1952 मध्ये लीड्स येथे विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पदार्पण केले. सलामीवीर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 10 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मधल्या फळीत ते स्थिरावले होते. 1961 मध्ये घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध त्यांनी आपला अंतिम सामना खेळला. 

1947 ते 1961 दरम्यान रणजी ट्रॉफीत खेळताना बडोदा संघासाठी ते एक भक्कम स्थान होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 36.40 च्या सरासरीने 5788 धावा केल्या. यादरम्यान त्यांनी 17 शतकं ठोकली. 1959-60 मध्ये महाराष्ट्राविरोधात 249 करत त्यांनी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. प्रथम श्रेणी करिअरमध्ये त्यांनी तीन द्विशतकं ठोकली. त्यांच्या नेतृत्वात 1957-58 मध्ये बडोदाने रणजी ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात त्यांनी सर्व्हिसेसचा पराभव केला होता. 

2016 मध्ये, माजी फलंदाज दीपक शोधन यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाल्यानंतर दत्ताजीराव गायकवाड भारतातील सर्वात वयस्कर जिवंत कसोटी क्रिकेटपटू बनले होते. भारतातील सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू आता मद्रासचे क्रिकेटपटू चिंगलपुट गोपीनाथ आहेत, ज्यांचे वय 93 वर्षे आणि 349 दिवस आहे. .