IPL 2019: शाहरुखच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीबद्दल वर्णभेदी टिप्पणी, पण तो कोण आहे?

आयपीएलमध्ये मंगळवारी चेन्नईचा सामना कोलकात्याविरुद्ध झाला.

Updated: Apr 11, 2019, 10:42 PM IST
IPL 2019: शाहरुखच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीबद्दल वर्णभेदी टिप्पणी, पण तो कोण आहे? title=

चेन्नई : आयपीएलमध्ये मंगळवारी चेन्नईचा सामना कोलकात्याविरुद्ध झाला. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये झालेली ही मॅच बघण्यासाठी कोलकाता टीमचा मालक आणि अभिनेता शाहरुख खानही उपस्थित होता. शाहरुख खानच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीला सध्या सोशल नेटवर्किंगवर त्याच्या रंगावरून ट्रोल करण्यात येत आहे.

व्हीआयपी स्टॅण्डमध्ये शाहरुख शेजारी बसलेल्या या व्यक्तीचं नाव एटली कुमार आहे. एटली कुमार साधंसुधं नाव नसून तामीळ फिल्म इंडस्ट्रीमधला ओळखीचा चेहरा आहे. तामीळनाडूच्या मदुरईमध्ये जन्मलेल्या एटलीचं पूर्ण नाव अरुण कुमार आहे. एटली तामीळ चित्रपटांमध्ये डायरेक्टर आणि स्क्रीनप्ले-रायटरची भूमिका बजावतो.

एटली कुमारने २०१३ साली 'राजा रानी' चित्रपटातून एटलीनं पदार्पण केलं होतं. त्याच्या या चित्रपटाने दक्षिण भारतीय बॉक्स ऑफिसवर चार आठवड्यांमध्येच ५०० मिलियनपेक्षा जास्तची कमाई केली होती. यानंतर एटलीला 'बेस्ट डेब्यू डायरेक्टर' म्हणून 'विजय अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

एटलीसोबत त्याची पत्नी कृष्णा प्रियाही मॅच बघत होती. बऱ्याच कालावधीच्या प्रेम प्रकरणानंतर एटली आणि कृष्णा प्रिया यांनी २०१४ साली लग्न केलं. कृष्णा प्रियाने टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

सोशल मीडियावर एटली कुमारला त्याच्या रंगावरून ट्रोल करण्यात आलं, तेव्हा त्याच्या फॅन्सनी या ट्रोलरना सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

एटलीचं कौतुक करताना एक यूजर म्हणाला, 'हो, तो कृष्णवर्णीय आहे. प्राचीन भारतातल्या नागरिकांच्या त्वचेचा रंग कसा होता, हेदेखील तुम्हाला माहिती नाही का? काही जण ही मॅच टीव्हीवर बघत आहेत, तर काही तिकीटाचे पैसे देऊन स्टेडियममध्ये बघत आहेत. पण एटली व्हीआयपी स्टॅण्डमध्ये शाहरुखच्या बाजूला बसून मॅच बघत आहे. हे त्याने स्वत:च्या प्रतिभेनं मिळवलं आहे.'