'आम्हालाही कप जिंकून दे' म्हणत धोनीला RCB च्या कॅप्टनशीपची ऑफर? धोनी म्हणाला, 'तो संघ..'

IPL 2024 Dhoni RCB Offer: रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर तो दुसऱ्या संघात जाण्याची जोरदार चर्चा असतानाच आता धोनीला थेट आरसीबीकडून खेळण्याची ऑफर आलीय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 21, 2023, 11:44 AM IST
'आम्हालाही कप जिंकून दे' म्हणत धोनीला RCB च्या कॅप्टनशीपची ऑफर? धोनी म्हणाला, 'तो संघ..' title=
एका जाहीर कार्यक्रमामध्ये घडला हा सारा प्रकार

IPL 2024 Dhoni RCB Offer: इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचं 2024 चं पर्व सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलण्यात आला. रोहित शर्माकडून नेतृत्व काढून घेत गुजरात टायटन्समधून पुन्हा स्वगृही परतलेल्या हार्दिक पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. असं असतानाच आता रोहित शर्मा दुसऱ्या संघाकडून खास करुन चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरु असतानाच एका जाहीर कार्यक्रमामध्ये थेट महेंद्र सिंग धोनीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघासाठी खेळण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धोनी समोर असतानाचा त्याला ही ऑफर देण्यात आली. त्यावर धोनीने तिथेच या मागणीवर दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याच्या उत्तरला दाद दिली.

धोनीकडे केली अजब मागणी

एका जाहीर कार्यक्रमामध्ये एका तरुणाने धोनीकडे एक मागणी केली. "मी मागील 16 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कट्टर चाहता आहे. तू चेन्नई सुपर किंग्जला 5 वेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की तू आरबीला पाठिंबा द्यावा आणि आमच्यासाठी एक चषक जिंकून द्यावा," असं एका चाहत्याने जाहीर कार्यक्रमामध्ये धोनीकडे साकडं घातलं. 

धोनी आरसीबीबद्दल काय म्हणाला?

"तो संघ (आरसीबी) फार चांगला आहे. मात्र क्रिकेटमध्ये सर्व काही ठरवल्याप्रमाणे होत नाही. जर आपण आयपीएलबद्दल बोललो तर असं दिसून येईल की पूर्ण क्षमतेनं संघ असेल तर सर्व शक्तीशाली खेळाडू असतात. सर्व संघ शक्तीशाली असतात. तुमच्या संघातील एखादा खेळाडू जायबंदी झाल्याने किंवा इतर कारणाने खेळू शकत नाही तेव्हा खरी अडचण निर्माण होते. तो फारच उत्तम संघ आहे," असं धोनीने आरसीबीबद्दल बोलताना म्हटलं.

मी असं केलं असेल तर...

"आयपीएलमध्ये सर्वांना समान संधी असते. आताची स्थिती पाहिल्यास मला स्वत:च्या संघाबद्दलच्या अनेक समस्यांना तोंड द्यायचं आहे. त्यामुळे मला प्रत्येक संघाला उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. मात्र या शिवाय मी इतर काहीही करु शकत नाही. कारण तुम्ही विचार करा की मी आऊट ऑफ द वे जाऊन इतर कोणत्या तरी संघाला समर्थन करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या चाहत्यांना काय वाटेल. तुला स्वत:ला काय वाटेल," असं उत्तर धोनीने दिलं.