विराट कोहली की संजू सॅमसन, एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी? अशी आहे राजस्थान-बंगळुरुची Playing XI

IPL 2024, RCB vs RR Eliminator Match: आयपीएलच्या सतराव्या हंगामात आज एलिमिनेटर सामना खेळवला जाणार असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. आरसीबीने सलग सामने जिंकत प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. 

राजीव कासले | Updated: May 22, 2024, 04:43 PM IST
विराट कोहली की संजू सॅमसन, एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी? अशी आहे राजस्थान-बंगळुरुची Playing XI title=

IPL 2024, RCB vs RR Eliminator Match : इंडियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये आज एलिमिनेटरचा सामना (Eliminator Match) खेळवला जाणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने असणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stidium) हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. या सामन्यात विजेता ठरलेला संघ क्वालिफायर राऊंडमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाशी खेळेल. आरसीबीने सलग सामने जिंकत प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. तर राजस्थान रॉयल्सला शेवटच्या काही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.

राजस्थानची घसरती कामगिरी
राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये दमदार सुरुवात केली. सुरुवातीचे काही सामने जिंकत राजस्थानने टॉप दोनमध्ये जागा पटकावली. पण त्यानंतर त्यांना सलग 4 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. तर लीगमधला शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे राजस्थानला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. 2008 चा चॅम्पियन ठरलेला राजस्थानचा संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. पण शेवटच्या सलग चार सामन्यातील पराभवांमुळे त्यांच्या उणीवा समोर आल्या. त्यातच राजस्थानचा प्रमुख फलंदाज जोस बटलर इंग्लंडला परतला आहे. याचा परिणाम त्यांच्या फलंदाजीवर झालाय. राजस्थानच्या फलंदाजीची सर्व मदार आता यशस्वी जयस्वाल, कर्णधार संजू सॅमसन आणि रियान परागवर आहे. शिमरोन हेटमायर खालच्या फळीत तारणहार ठरू शकतो. पण या हंगामात हेटमायर फारसा चमकला नाही.

आरसीबी जबरसदस्त फॉर्मात
दुसरीकडे बंगळुरुचा संघ जबरदस्त आत्मविश्वासाने प्ले ऑफमध्ये उतरणार आहे. सुरुवातीला 8 पैकी 7 सामने हरणाऱ्या बंगळुरुने सलग सहा सामने जिंकत थेट प्लेऑफमध्ये धडक मारली. शेवटच्या लीग सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा पराभव केला. बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. विराटने 14 सामन्यात 708 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही विराट अव्वल स्थानावर आहे. विराटबरोबर कर्णधार फाफ डू प्लेसीसुद्धा चांगल्या फॉर्मात आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या रजत पाटीदारने या हंगामात पाच अर्धशतकं लगावली आहेत. इंग्लंडचा आक्रमक फलंदाजी विल्स जॅक्स मायदेश परतलाय. पण याचा फारसा परिणाम संघावर झालेला नाही. खालच्या क्रमांकावर दिनेश कार्तिक 195 स्ट्राईक रेटने धावा करतोय. 

मोदी स्टेडिअमची गोलंदाजांना साथ
अहमदाबादच्य नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आतापर्यंत झालेल्या सामन्यांचा इतिहास पाहाता गोलंदाजांना साथ मिळतेय. यंदाच्या हंगामात या मैदानावर खेळवण्यात आलेल्या 12 सामन्यात केवळ दोनदा 200 धावा पार झाल्यात. त्यामुळे राजस्थान आणि बंगळुरुच्या गोलंदाजांवर जास्त मदार असणार आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई,  महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार विशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज,  हिमांशु शर्मा, राजन कुमार, कॅमरन ग्रीन, अल्जारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान

राजस्थान रॉयल्सचा संघ
संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा,  कुलदीप सेन, कुणाल सिंह राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, रोवमॅन पावेल, टॉम कोहलर-केडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जायसवाल, युजवेंद्र चहल, तनुश कोटियन.