IPL झालं 16 वर्षांचं! कोणत्या मैदानावर, कोणत्या संघात रंगला होता पहिला सामना? 'हा' संघ ठरला होता विजयी

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला आज सोळा वर्ष पूर्ण झाली. आयपीएलच्या इतिहासातला पहिला सामना बंगलुरुच्या के एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान पहिला सामना रंगला होता. 

राजीव कासले | Updated: Apr 18, 2024, 02:59 PM IST
IPL झालं 16 वर्षांचं! कोणत्या मैदानावर, कोणत्या संघात रंगला होता पहिला सामना? 'हा' संघ ठरला होता विजयी title=

IPL Birthday, KKR vs RCB 1st Match : क्रिकेट जगतात 18 एप्रिलला हा दिवस खूपच खास आहे. याच दिवशी इंडियन प्रीमिअर (IPL) लीग अर्थात आयपीएलला सुरुवात झाली. 18 एप्रिल 2008 रोजी आयपीएलचा पहिला सामना खेळवण्यात आला. पहिल्या आयपीएलचं जेतेपद शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने (Rajastan Royals) जिंकलं होतं. आयपीएलला आज सोळा वर्ष पूर्ण झाली. आयपीएल इतिहासातील पहिला सामना बंगळुरुच्या के एम चिन्नास्वामी स्टेडि्ममध्ये खेळवण्यात आला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघांमध्ये पहिला सामना रंगला.

कोलकाताने आरसीबीचा उडवला धुव्वा
आयपीएलच्या पहिल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सची धुरा सौरव गांगुलीच्या हाती होती. तर राहुल द्रविड रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार होता. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात कोलकाताने बंगलोरच्या अक्षरश: धुव्वा उडवला. केकेआरने पहिली फलंदाजी करत 3 विकेट गमावत 222 धावा केल्या. तर आरसीबीचा संघ 15.1 षटकात अवघ्या 82 धावांवर ऑलआऊट झाला. केकेआरने तब्बल 140 धावांनी मोठा विजय मिळवला. 

केकेआरच्या विजयाचा हिरो
कोलकाता नाईट रायडर्सच्या पहिल्या विजयाचा हिरो ठरला होता तो सलामीवीर ब्रँडन मॅक्युयलम. मॅक्युलमने अवघ्या 73 चेंडूत 158 धावा केल्या. यात त्याने 13 षटकार आणि 10 चौकारांची आतषबाजी केली. ब्रँडन मॅक्युलम आयपीएल इतिहासातील पहिला 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला होता.

राजस्थानला पहिलं जेतेपद
आयपीएल 2008 च्या पहिल्या हंगामाचं जेतेपद राजस्थान रॉयल्सने पटकावलं होतं. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने ही कमाल केली. अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईस सुपर किंग्सचा 3 विकेटने पराभव केला. चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व महेंद्र सिंग धोनीकडे होतं. 

आयपीएल आणि वाद
आयपीएल आणि वाद असं समीकरणच बनलं होतं. 2008 ते 2010 दमम्यान ललित मोदी हे आयपीएलचे अध्यक्ष होते. आयपीएल 2010 नंतर ललित मोदी यांच्यावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप करण्यात आला आणि त्यांना बीसीसीआयने बाहेरचा रस्ता दाखवला. 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला. तर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या जावयाला सट्टेबाजी प्रकरणी अटक करण्यात आली.

आयपीएल जिंकणाऱ्या संघांची यीदी
1. 2008- राजस्थान रॉयल्स
2. 2009- डेक्कन चार्जर्स
3. 2010- चेन्नई सुपर किंग्स
4. 2011- चेन्नई सुपर किंग्स
5. 2012- कोलकाता नाइट राइडर्स
6. 2013- मुंबई इंडियन्स
7. 2014- कोलकाता नाइट राइडर्स
8. 2015- मुंबई इंडियन्स
9. 2016- सनराइजर्स हैदराबाद
10. 2017- मुंबई इंडियन्स
11. 2018- चेन्नई सुपर किंग्स
12. 2019- मुंबई इंडियन्स
13. 2020- मुंबई इंडियन्स
14. 2021- चेन्नई सुपर किंग्स
15. 2022- गुजरात टाइटन्स
16. 2023- चेन्नई सुपर किंग्स