आयपीएलमुळे लॉटरी लागणार, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नऊ खेळाडूंची जागा पक्की

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पडतोय. यंदाचा हंगाम फलंदाजांनी गाजवला आहे. चौकार आणि षटकरांची बरसात होतेय. विशेष म्हणजे यात भारतीय युवा खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय.

राजीव कासले | Updated: Apr 23, 2024, 02:54 PM IST
आयपीएलमुळे लॉटरी लागणार, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नऊ खेळाडूंची जागा पक्की title=

Predicted Players For T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपसाठी संघ निवडीसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. 1 मे पूर्वी संघ निवडावा लागणार आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) टीम इंडियात (Team India) कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाची निवड केली जाणार असल्याचं बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीने आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आयपीएमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआयचं बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात (IPL 2024) काही दिग्गज भारतीय खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनीही निवड समितीचं लक्ष वेधलं आहे. या खेळाडूंचं संघातील स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. 

आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंची दमदार कामगिरी
टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात ज्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात पहिलं नाव आहे ते हिटमॅन रोहित शर्माचं. टी20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असणार हे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे. आयपीएलमध्येही रोहित शर्मा खोऱ्याने धावा करतोय. आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात रोहितने 303 धावा केल्यात. यात एका शतकाचाही समावेश आहे. 

रोहितबरोबरच विराट कोहलीचं नावही जवळपास पक्कं आहे. आयपीएलमध्ये विराट कोहली टी20 क्रिकेटचा खेळाडू नाही अशी टीका केली जात होती. पण विराटने आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करत टीकाकारांची तोंड बंद केली आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने 8 सामन्यात 379 धावा केल्या असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत त अव्वल स्थानावर आहे. 

रोहित शर्माबरोबर भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता आहे. आपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात यशस्वीला फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नव्हती. पण 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सबरोबरच्या सामन्यात खणखणीत शतक ठोकत यशस्वीने आपला दावा मजबूत केला आहे. 

विकेटकिपिंग-फलंदाज म्हणून यंदा पाच खेळाडूंमध्ये तगडी चुरस आहे. यात ऋषभ पंत, केएल राहुल, ईशान किशन, संजू सॅमसन आणि दिनेश कार्तिकचा समावेश आहे. यापैकी ऋषभ पंत आणि केएल राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. दिनेश कार्तिकनेही यंदाच्या आयपीएलमध्ये आपली छाप उमटवली आहे. 

गोलंदाजीत भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं संघातील स्थान निश्चित आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये बुमराहने भेदक गोलंदाजी केली आहे. बुमराहने 8 सामन्यात तब्बल 13 विकेट घेतल्या आहेत. पर्पर कॅपच्या शर्यतीत बुमराह टॉपवर आहे.

ऑलराऊंडर म्हणजे रवींद्र जडेजाचं नाव निश्चित आहे. फलंदाजीबरोबर मधल्या षटकात विकेट घेण्याबरोबरच धावा रोखण्यात जडेजा माहिर आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचाही जडेजाला अनुभव आहे. 

शिवम दुबे, रिंकू सिंह आणि सूर्यकुमार यादवही या शर्यतीत आहेत. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या शिवम दुबेच्या बॅटमधून यंदा धावांचा ओघ वाहतोय. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभम दुबेने 7 सामन्यात 245 धावा केल्या असून चेन्नईला अनेक सामन्यात शुभमने विजय मिळवून दिला आहे. रिंकू सिंगला म्हणावा तसा स्कोर करता आलेला नाही. याचं प्रमुख कारण रिंकू सिंग सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याला फलंदाजी मिळत नाही. 

याशिवाय पंजाब किंग्सचे शशांक सिंग, आशुतोष शर्मा, सनरायजर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा आण लखनऊ सुपर जायंट्सा वेगवान गोलंदाज मयंक यादव यांनीही बीसीसीआयंच लक्ष वेधून घेतलं आहे.