फक्त 29 धावा आणि विराट आयपीएलमध्ये रचणार इतिहास... ठरणार पहिला फलंदाज

IPL 2024 Virat Kohli : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा, सर्वाधिक षटकार आणि चौकारांचा विक्रम मोडीत निघालाय. आता आणखी एक विक्रम रचला जाणार आहे. 

राजीव कासले | Updated: May 22, 2024, 06:25 PM IST
फक्त 29 धावा आणि विराट आयपीएलमध्ये रचणार इतिहास... ठरणार पहिला फलंदाज title=

Most Runs In IPL History : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने असणार आहेत. या सामन्यातील विजयी संघ क्वालिफायरमध्ये सनरायजर्स हैदाराबादशी (SRH) दोन हात करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास इथेच संपेल. बंगळुरु आणि राजस्थानदरम्यानचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी जितका हा सामना महत्त्वाचा आहे, तितकाचा आणखी एका गोष्टीसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Vita Kohli) इतिहास रचण्याची संधी आहे.

विराट कोहली रचणार इतिहास
बंगळुरु आणि राजस्थानदरम्यानच्या सामन्यात सर्वांचं लक्ष असणार आहे ते विराट कोहलीच्या फलंदाजीवर. विराटने 29 धावा केल्यास आयपीएलमध्ये एक नवा विक्रम रचला जाणार आहे. विराट कोहलीने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 7971 धावा केल्या आहेत. म्हणजे 29 धावा केल्यास तो 8 हजार धावांचा टप्पा पार करेल. आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरणार आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ वाहतोय. विराटने आतापर्यंत खेळलेल्या 14 सामन्यात 155.60 च्या स्ट्राइक रेटने आतापर्यंत 708 धावा केल्या आहेत. यात 37 षटकार आणि 59 चौकारांचा समावेश आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीतही विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. 

विराट कोहलीची आयपीएल कारकिर्द
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून विराट कोहली खेळतोय. विराट कोहली आयपीएलमध्ये आतापर्यंत 252 सामने खेळला आहे. यात त्याने  131.95 च्या स्ट्राइक रेटने 7971 धावा केल्या आहेत. या दरम्यान आयपीएलमध्ये त्याने 8 शतकं ठोकलीत. तर तब्बल 55 वळा अर्धशतकं झळकावली आहेत. विशेष म्हणजे पहिल्या हंगामापासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळतोय. पण आयपीएलच्या गेल्या सतरा वर्षात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जेतेपद पटकावता आलेलं नाही.

विराट कोहलीला धमकी
दरम्यान, बंगळुरु आणि राजस्थानदरम्यानच्या सामन्याआधी एक मोठी घडामोड घडली आहे. आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीला धमकी (Virat Kohli Threat) मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात गुजरात पोलिसांनी 4 संशयित आरोपींना सोमवारी रात्री गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) अहमदाबादच्या विमानतळावरून अटक केली. आरसीबीने अजूनही यावर अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य केलं नाही. मात्र, पोलिसांनी यावर माहिती दिलीये.