'मला फार चिंता करण्याची गरज नाही कारण...'; CSK चा कॅप्टन झाल्यानंतर ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया

IPL 2024 Ruturaj Gaikwad First Comment As Captain: महेंद्रसिंह धोनीकडून कर्णधारपद स्वीकारल्यानंतर मराठमोळा ऋतुराज गायकवाड पहिल्यांदाच या नव्या जबाबदारीसंदर्भात मनमोकळेपणे व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 22, 2024, 08:20 AM IST
'मला फार चिंता करण्याची गरज नाही कारण...'; CSK चा कॅप्टन झाल्यानंतर ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया title=
धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे

IPL 2024 Ruturaj Gaikwad First Comment As Captain: इंडियन प्रिमीअर लीगच्या 17 व्या पर्वाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आपला कर्णधार बदलला आहे. महेंद्रसिंह धोनी पदावरुन पायउतार झाला असून मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. ऋतुराज पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. आता चेन्नईला सहावं जेतेपद जिंकवून देण्याची जबाबदारी ऋतुराजच्या खांद्यावर असणार आहे. धोनीचं हे शेवटचं आयपीएल असल्याची चर्चा पूर्वीपासूनच होती. मात्र आयपीएलच्या ट्रॉफीबरोबरच्या कर्णधारांच्या फोटोशूटआधीच धोनीने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत ऋतुराजकडे कर्णधार पद सोपवत हे त्याचं आयपीएलचं शेवटचं पर्व असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान कर्णधारपद मिळाल्यानंतर ऋतुराजने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

इथे प्रत्येकजण...

माझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तरीही संघात महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा आणि इतर खेळाडू असल्याने काम तसं फारसं कठीण नाही, असं ऋतुराजने म्हटलं आहे. आजच चेन्नई विरुद्ध बंगळुरुदरम्यान आयपीएल 2024 मधील पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यात अगदी टॉसपासून ते सर्वच ठिकाणी ऋतुराजच कर्णधार म्हणून दिसणार आहे. ऋतुराजकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्यानंतर त्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ चेन्नईच्या संघाच्या सोशल मीडिया अकाऊंवरुन पोस्ट करण्यात आला आहे. "हा फार मोठा सन्मान आहे. मात्र त्याहून ही मोठी जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने सध्याचा संघ आहे तो पाहता मी खरंतर फार उत्सुक आहे. इथे प्रत्येकजण अनुभवी आहे. त्यामुळे मला फारसं काही वेगळं करायचं नाहीये," असं ऋतुराज म्हणाला. 

धोनी, जडेजा आणि अजिंक्य राहणेचा उल्लेख

"माझ्याबरोबर संघात माही भाई आहे, जड्डू भाईही आहे. अज्जू भाई सुद्धा आहे. हे सारे उत्तम कर्णधार असून ते मला मार्गदर्शन करतील," असा विश्वास ऋतुराजने व्यक्त केला. पुढे बोलताना ऋतुराजने अनेक अनुभवी क्रिकेटपटू संघात असल्यानेच "मला फार चिंता करण्याची गरज वाटत नाही. केवळ मैदानात जाऊन खेळाचा आनंद घ्यायचा आहे," असंही म्हटलं.

आयपीएलमधील ऋतुराजची कामगिरी

ऋतुराज हा चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. तो 2020 पासून या संघातून खेळतोय. त्याने आतापर्यंत 52 आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने 1797 धावा केल्या आहेत. ऋतुराजच्या नावावर एक शतक आणि 14 अर्धशतकं आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 101 इतकी आहे. हा 27 वर्षीय सलामीवीर आयपीएलमध्ये एकदा ऑरेंज कॅप विजेता म्हणजेच पर्वात सर्वाधिक धावा करणार खेळाडूही ठरला आहे. संघाला वेगवान आणि स्फोटक सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी गायकवडाच्या खांद्यावर आहे.