IPL Auction 2019: पठाणनं शोधलेला काश्मीरी हिरा, मुंबईकडून खेळणार

२०१९ साली होणाऱ्या आयपीएलचा लिलाव मंगळवारी जयपूरमध्ये पार पडला.

Updated: Dec 19, 2018, 06:00 PM IST
IPL Auction 2019: पठाणनं शोधलेला काश्मीरी हिरा, मुंबईकडून खेळणार title=

श्रीनगर : २०१९ साली होणाऱ्या आयपीएलचा लिलाव मंगळवारी जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये जम्मू-काश्मीरचा युवा क्रिकेटपटू रसिक सलाम याला मुंबईच्या टीमनं त्याची बेस प्राईज २० लाख रुपयांना विकत घेतलं. १७ वर्षांचा रसिक सलाम यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वातल्या मुंबईच्या टीमकडून खेळेल. रसिक सलाम दार हा दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात राहतो. माझ्यासाठी हा रोमांचक क्षण आहे. माझ्या भावनांवर काबू ठेवणं मला कठीण जात आहे. माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं मला वाटतं आहे, अशी प्रतिक्रिया रसिकनं दिली आहे. फास्ट बॉलर असणाऱ्या रसिकनं विजय हजारे ट्रॉफीमधून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ऑक्टोबर महिन्यात रसिक सलाम मुंबईच्या ट्रायल्समध्येही सहभागी झाला होता.

रसिक सलामचा जन्म ५ एप्रिल २००१ साली झाला आहे. आत्तापर्यंत रसिकनं जम्मू-काश्मीरकडून २ मॅच खेळल्या. यामध्ये त्यानं ३ विकेट घेतल्या आहेत. रसिक सलाम पहिली मॅच तामीळनाडू आणि दुसरी मॅच राजस्थानविरुद्ध खेळला. यातल्या पहिल्या मॅचमध्ये त्यानं २ आणि दुसऱ्या मॅचमध्ये १ विकेट घेतली.

फास्ट बॉलर असलेला रसिक सलाम इन स्विंग आणि आऊट स्विंग करण्यात सक्षम आहे. जम्मू-काश्मीरच्या शेर ए काश्मीर स्टेडियममध्ये झालेल्या टॅलेंट हंट कॅम्पमध्ये फास्ट बॉलर इरफान पठाणच्या नजरेत रसिक सलाम आला होता. रसिक सलामची बॉलंग बघून इरफान पठाण प्रभावित झाला. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये इरफान पठाणनं रसिकला बॉलिंग टिप्सही दिले. आयपीएलच्या मुंबई टीममध्ये गेल्यामुळे रसिकला मलिंगा आणि बुमराहकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील.

रसिक सलाम हा आयपीएलमधला जम्मू-काश्मीरचा तिसरा खेळाडू आहे. याआधी परवेज रसूल आणि मंजूर दार आयपीएल टीममध्ये होते. यातल्या परवेज रसूललाच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. मंजूर दार पंजाबच्या टीममध्ये असला तरी त्याला एकही मॅचमध्ये खेळवण्यात आलं नाही.