IND vs WI : धवन पॉझिटिव्ह आल्याने हा खेळाडू करणार ओपनिंग, ऋतुराजच्या जागी या खेळाडूला संधी

 टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी माध्यमांशी संवाद साधला. रोहित शर्माने 19 वर्षांखालील टीम इंडियाला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Updated: Feb 5, 2022, 07:43 PM IST
IND vs WI : धवन पॉझिटिव्ह आल्याने हा खेळाडू करणार ओपनिंग, ऋतुराजच्या जागी या खेळाडूला संधी title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शनिवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी माध्यमांशी संवाद साधला. सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे की, पहिल्या सामन्यात इशान किशन त्याच्यासोबत सलामी करेल. विराट कोहलीने जिथून सोडले होते तेथून पुढे चालू ठेवणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. 

वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाची कोरोना चाचणी झाली तेव्हा भारतीय संघातील काही खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळून आले, त्यात शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे, त्यानंतर बीसीसीआयने मयंक अग्रवाल आणि इशान किशन यांचा संघात समावेश केला आहे.

यासोबतच रोहित शर्माने 19 वर्षांखालील टीम इंडियाला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या, भारताच्या युवा संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून आजचा सामना जिंकूनही भारतीय संघ पुन्हा एकदा विजेतेपदावर कब्जा करेल अशी अपेक्षा असल्याचे रोहित शर्माने म्हटले.

भारतीय संघाच्या फिनिशरबाबत रोहित शर्मा म्हणाला की, एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्या हे काम करत होता. मात्र त्यानंतरही या कामासाठी आणखी काही खेळाडूंची गरज भासणार आहे. यादरम्यान रोहित शर्माला विचारण्यात आले की, तो तरुणांना अधिक संधी देणार का? यावर रोहित शर्माने मजेशीर स्वरात सांगितले की, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी द्यावी आणि शिखर धवन आणि मी बाकावर बसावे, असे तुम्हाला म्हणायचे तर नाही. 

विराट कोहलीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रोहित शर्मा म्हणाला की, विराटला माहित आहे की त्याला संघासाठी काय करायचे आहे. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांचा संघात समावेश करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, या दोघांनी यापूर्वीही संघासाठी विशेष भूमिका बजावली आहे. पुन्हा एकदा हे दोघे एकत्र खेळताना दिसणार आहेत. तो म्हणाला की, कुलदीप यादवने गेल्या काही दिवसांत फारसे सामने खेळलेले नाहीत, आम्हाला त्याच्याबद्दल घाई करायची नाही. चहल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला, तर कुलदीप पुनरागमन करत आहे. त्यांचा योग्य वापर कसा करता येईल ते पाहू, असे ही तो पुढे म्हणाला.