इशांत शर्माचा १०० वा टेस्ट सामना, राष्ट्रपतींनी खास भेट देत केला सन्मान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमचे आज उद्घाटन केले.

Updated: Feb 24, 2021, 05:53 PM IST
इशांत शर्माचा १०० वा टेस्ट सामना, राष्ट्रपतींनी खास भेट देत केला सन्मान title=

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी पराभूत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने दुसर्‍या सामन्यात 317 धावांनी विजय मिळवून शानदार पुनरागमन केले. या मालिकेचे शेवटचे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले जातील. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा 100 वा कसोटी सामना आहे. या खास प्रसंगी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इशांत शर्माला एक खास भेट दिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इशांत शर्माला 100 वा कसोटी सामन्यासाठी एक कॅप आणि स्मृतिचिन्ह दिले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले.

इशांत शर्माने बांगलादेश विरुद्ध ढाका येथे 2007 साली कसोटी सामन्यात प्रवेश केला होता. इशांत शर्माने आतापर्यंत 99 कसोटी सामन्यांमध्ये 32.22 च्या सरासरीने 302 विकेट्स घेतल्या आहेत. इशांतने भारतीय खेळपट्ट्यांवर 39 कसोटी सामन्यांमध्ये 103 गडी बाद केले आहेत तर विदेशी खेळपट्ट्यांवर 60 कसोटी सामन्यात 199 विकेट्स घेतल्या आहेत.

प्रेक्षकांच्या क्षमतेच्या दृष्टीने अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये 1 लाख 10 हजार लोकं एकाच वेळी उपस्थित राहू शकतात. या सामन्यासाठी बीसीसीआयने यापूर्वी 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली आहे, अशा परिस्थितीत 50000 पेक्षा जास्त लोकं या सामन्यात उपस्थित राहू शकतात.

तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्घाटन सोहळा पार पडला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन झाले. उद्घाटन सोहळ्यास भारताचे गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.