...तर सामना जिंकलो असतो, केन विलियमसनची खंत

वेळेत डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला असता तर, कदाचित सामन्याचा निर्णय वेगळा असता.

Updated: Feb 4, 2019, 05:03 PM IST
...तर सामना जिंकलो असतो, केन विलियमसनची खंत title=

हॅमिल्टन : भारताविरुद्ध झालेल्या शेवटच्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा ३५ रननी पराभव झाला. याचबरोबर न्यूझीलंडचा ५ वनडे मॅचच्या या मालिकेत ४-१नं पराभव झाला. खरं तर पराभवाचं हे अंतर ३-२ करण्याची संधी न्यूझीलंडला होती, पण मैदानात केलेल्या एका चुकीचा फटका किवींना बसला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन यानेही याबद्दलची खंत बोलून दाखवली. रॉस टेलर खेळत असताना डीआरएस घेतला असता, तर आम्ही सामना जिंकू शकलो असतो, असं विलियमसन म्हणाला.  

नक्की काय घडले ?

भारतीय टीमनं न्यूझीलंडला विजयासाठी २५३ रनचं आव्हान दिले होते. या आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडला भारतीय बॉलरनी सुरुवातीलाच झटके दिले. न्यूझीलंडने ३७ रनवरच दोन विकेट गमावले होते. जेव्हा टेलर मैदानात आला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ३७ अशी होती. चौथ्या क्रमांकावर आलेल्या रॉस टेलरला जास्त वेळ मैदानात टिकता आले नाही. हार्दिक पांड्याने त्याला अवघ्या १ रनवर एलबीडबल्यू केले. पण रिप्ले बघितले असता टेलर हा बाद नसल्याचं निदर्शनास आलं, कारण बॉल स्टम्पवरून गेला होता. 

आऊट दिलं गेलं तेव्हा टेलरसोबत कर्णधार केन विलियमसन उपस्थित होता. या दोघांमध्ये पुरेसा संवाद न झाल्याने रॉस टेलरला डीआरएस घेता आला नाही. मैदानातून माघारी जाताना टेलर मला म्हणाला की "डीआरएस घ्यायला हवा होता, बहुतेक हा बॉल स्टंपपेक्षा उंच गेला". पंचांनी दिलेला निर्णय हा समाधानकारक नसल्यास त्या संबंधित फलंदाजाला १५ सेकंदांमध्ये पंचाच्या निर्णयाला आव्हान देत डीआरएस घेता येतो.  

ज्या बॉलवर टेलरला एलबीडबल्यू देण्यात आले, तो बॉल टेलरच्या गुडघ्यावर लागला होता. मैदानातील पंचानी बाद घोषित केल्यानंतर रॉस टेलरने आणि मी वेळेत डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला असता तर, कदाचित सामन्याचा निर्णय वेगळा असता, अशी खंत विलियमसनने पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

'रॉस टेलरला चुकीचे बाद दिल्याचे मला समजले. हे फार निराशाजनक होते. जेव्हा आपल्या संघातील अनुभवी खेळाडू हा सातत्याने चांगली कामगिरी करत असतो, आणि त्याला चुकीच्या निर्णयामुळे बाद घोषित केले जाते. तेव्हा आपल्यात योग्य संवाद न झाल्याची जाणीव होते, तेव्हा रुखरुख वाटते'. असे सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केन विलियमसन म्हणाला. 

'जिमी निशाम देखील कमनशिबी ठरला. त्याला धोनीने आपल्या चपळतेने धावबाद केले. निशाम एलबीडबल्यू असल्याचे अपील केले. त्यावेळी क्रीझ सोडून तो बाहेर गेला होता. त्यावेळेसच धोनीने आपल्या चपळतेने नीशामला धावबाद केले. नीशाम चांगली खेळी करत होता. निशाम त्याच्या निष्काळजीपणामुळे बाद झाला. त्याचा पूर्णपणे जम बसला होता. निशाम आणि सेंटनर यांच्यात झालेल्या भागीदारीमुळे आम्हाला विजय जवळ दिसत होता'. असं वक्तव्य केन विलियमसननं केलं. 

विलियमसनने पत्रकार परिषदे दरम्यान, भारतीय टीमचे आणि बॉलिंगचे कौतुक केले. या पाच वनडे सामन्यांच्या सीरिजमध्ये आमच्यापेक्षा कितीतरी पट भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. आणि त्यांची बॉलिंगदेखील चांगली होती. भारताच्या वेगवान आणि फिरकीपटूंनी आमच्यावर दबाव बनवला, असं केन विलियमसन म्हणाला.