वर्ल्ड कपआधी शेवटची संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध यांची निवड होणार?

ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.

Updated: Feb 12, 2019, 08:49 PM IST
वर्ल्ड कपआधी शेवटची संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध यांची निवड होणार? title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर २ टी-२० आणि ५ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. २४ फेब्रुवारीपासून टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी भारतीय टीमची निवड १५ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. वर्ल्ड कप आधीचा भारताची ही शेवटची सीरिज असेल. यानंतर आयपीएल खेळवण्यात येईल आणि मग भारत वर्ल्ड कपसाठी रवाना होईल. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपआधी जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळावी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजसाठी १५ ऐवजी १६ खेळाडूंची निवड होऊ शकते.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ खेळाडूंना काही सामन्यांसाठी विश्रांती दिली जाऊ शकते, तर या खेळाडूंच्याऐवजी वर्ल्ड कपसाठीच्या संभाव्य खेळाडूंचाही टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये केएल राहुल आणि अजिंक्य रहाणेचं पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं. रोहित शर्माला काही मॅच विश्रांती देऊन केएल राहुल या सीरिजमध्ये खेळू शकतो. राहुल पुन्हा फॉर्ममध्ये आला तर वर्ल्ड कपसाठीचा तिसरा ओपनर म्हणून त्याला संधी मिळू शकते. तर चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी अजिंक्य रहाणेचा विचार होऊ शकतो.

विकेट कीपरच्या बाबतीत धोनीचं स्थान पक्कं आहे, पण दुसऱ्या स्थानासाठी ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यामध्ये स्पर्धा आहे. बॅटिंगच्या बाबतीत भारतीय टीम वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत असली तरी बॉलिंगमध्ये मात्र फार बदल होणार नाहीत. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची निवड निश्चित मानली जात आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिली टी-२० २४ फेब्रुवारीला विशाखापट्टणममध्ये, दुसरी टी-२० २७ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये, पहिली वनडे २ मार्चला हैदराबाद, दुसरी वनडे ५ मार्चला नागपूर, तिसरी वनडे ८ मार्चला रांची, चौथी वनडे १० मार्चला मोहाली आणि पाचवी वनडे १३ मार्चला दिल्लीमध्ये होईल.