'महेंद्रसिंग धोनीपेक्षा जास्त देशसेवा कोणत्याच क्रिकेटपटूने केली नाही'

मागच्या वर्षी फॉर्मसाठी झगडणारा एमएस धोनी यावर्षी वर्ल्ड कपआधी जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे.

Updated: Apr 23, 2019, 10:53 PM IST
'महेंद्रसिंग धोनीपेक्षा जास्त देशसेवा कोणत्याच क्रिकेटपटूने केली नाही' title=

नवी दिल्ली : मागच्या वर्षी फॉर्मसाठी झगडणारा एमएस धोनी यावर्षी वर्ल्ड कपआधी जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. टीका करणाऱ्या सगळ्यांना धोनीने त्याच्या बॅटनेच प्रत्युत्तर दिलं आहे. भारताला सगळ्यात पहिला १९८३ सालचा वर्ल्ड कप जिंकवून देणारे कर्णधार कपील देव यांनीही धोनीचं कौतुक केलं आहे. या खेळामध्ये धोनीचं योगदान सर्वाधिक असल्याचं कपिल देव म्हणाले. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ सालचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला.

'मला धोनीबद्दल काहीच बोलायचं नाही. धोनीएवढी देशसेवा दुसऱ्या कोणत्याच क्रिकेटपटूने केलेली नाही. मी त्याचा सन्मान करतो,' अशी प्रतिक्रिया कपील देव यांनी दिली.

इंग्लंडमध्ये होणारा हा वर्ल्ड कप धोनीचा शेवटचा असेल हे निश्चित आहे, पण तो निवृत्ती कधी घेणार याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या प्रश्नाचंही कपील देव यांनी उत्तर दिलं. 'त्याला किती खेळायचं आहे, तसंच त्याचं शरीर किती साथ देईल, हे कोणालाच माहिती नाही. पण धोनीएवढी देशसेवा केलेला दुसरा कोणताही क्रिकेटपटू नाही. आपल्याला त्याचा सन्मान केला पाहिजे आणि त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तो हा वर्ल्ड कपही जिंकवेल, अशी मी अपेक्षा करतो', असं वक्तव्य कपिल देव यांनी केलं.

वर्ल्ड कपसाठी निवड झालेल्या भारतीय टीमवरही कपिल देव संतुष्ट आहेत. 'भारतीय टीम चांगली वाटत आहे. पण हा वर्ल्ड कप सोपा असणार नाही. त्यांना प्रत्येक टीमविरुद्ध खेळायचं आहे. खेळाडूंना दुखापत होणार नाही, अशी माझी अपेक्षा आहे. त्याचं नशीब चांगलं असेल, तर ते जिंकतील', असं कपिल देव म्हणाले.

निवड समितीने ऋषभ पंतऐवजी ३३ वर्षांच्या दिनेश कार्तिकला दुसरा विकेट कीपर म्हणून संधी दिली. ऋषभ पंतला संधी न मिळाल्यामुळे अनेक दिग्गजांनी यावर टीका केली होती. पण कपिल देव यांनी ही निवड योग्य असल्याचं म्हणलं. 'निवड समितीने त्यांचं काम केलं आहे. आता आपल्याला टीमचा सन्मान केला पाहिजे. पंतऐवजी त्यांनी कार्तिकला पसंती दिली, ते ठीक आहे. निवड समितीने चांगलं काम केलं आहे, हे आपण मानलं पाहिजे', असं कपिल देव म्हणाले.