विराट कोहली पद सोडणार?

 देशातली दुसरी सगळ्यात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक सध्या चर्चेमध्ये आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 21, 2018, 09:05 PM IST
विराट कोहली पद सोडणार? title=

मुंबई : देशातली दुसरी सगळ्यात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक सध्या चर्चेमध्ये आहे. बँकेमध्ये झालेल्या ११,६०० कोटींपेक्षा जास्तच्या घोटाळ्यामुळे जोरदार टीका होत आहे. या घोटाळ्याचा मास्टर माईंड हिरा व्यापारी नीरव मोदी अजूनही फरार आहे. तर सीबीआय आणि ईडीकडून नीरव मोदीची कार्यालयं आणि दुकानांवर छापेमारी सुरु आहे.

बँकेमध्ये झालेल्या या घोटाळ्यामुळे सामान्य नागरिक चिंतेमध्ये आहे. बँकेमध्ये ठेवलेल्या पैशांचं काय होणार असा सवाल ठेवीदारांना पडला आहे. यामध्येच आता पंजाब नॅशनल बँकेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर विराट कोहली त्याचं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पद सोडू शकतो.

विराट कोहली किंवा बँकेककडून याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. कोणत्याही ब्रॅण्डवर आरोप झाले तर याचा फटका सेलिब्रिटीलाही बसतो. त्यामुळे अशा वादांपासून लांब राहण्याचा प्रयत्न सेलिब्रिटी करतात. विराट कोहली २०१६ सालपासून पंजाब नॅशनल बँकेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.

धोनीनंही तोडलं 'आम्रपाली'शी नातं

भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं बांधकाम कंपनी आम्रपालीचं ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पद सोडलं होतं. आम्रपाली ग्रुप वादामध्ये अडकल्यामुळे धोनीनं हे पाऊल उचललं होतं.

या सेलिब्रिटींकडून प्रमोशन

नीरव मोदीच्या ज्वेलरी ब्रॅण्डसाठी प्रियांका चोप्रा, लीजा हेडन, जॅकलीन फर्नांडिस आणि सोनम कपूर यांनी प्रमोशन केलं आहे. पण आता या सेलिब्रिटी वादापासून लांब व्हायचा प्रयत्न करत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राचं स्पष्टीकरण

एक वर्षाआधीच माझा करार संपुष्टात आल्याचं स्पष्टीकरण बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं दिलं आहे. माझा आणि नीरव मोदीचा काहीही संबंध नाही, असंही सिद्धार्थ म्हणाला.

प्रियांका चोप्रानंही केले आरोप

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नीरव मोदीच्या हिऱ्यांच्या कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. पण आता प्रियांका चोप्रानंही नीरव मोदीवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. जाहिरात करण्यासाठी ठरवण्यात आलेले पैसे नीरव मोदीकडून मिळालं नसल्याचा आरोप प्रियांका चोप्राच्या मॅनेजमेंटकडून करण्यात येतोय.