पृथ्वी शॉच्या Insta Story ची चर्चा! अनेकांना पडलं कोडं, शिड्यांवरुन उतरतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाला...

Prithvi Shaw Instagram Story: भारतीय संघांमधून मागील बऱ्याच काळापासून बाहेर असलेल्या पृथ्वी शॉने मागील काही दिवसांपासूनच इंग्लंडमधील रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र सध्या त्याची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 20, 2023, 10:20 AM IST
पृथ्वी शॉच्या Insta Story ची चर्चा! अनेकांना पडलं कोडं, शिड्यांवरुन उतरतानाचा फोटो पोस्ट करत म्हणाला... title=
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीनं वेधलं लक्ष

Prithvi Shaw Instagram Story: स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेला पृथ्वी शॉ मागील बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. सातत्याने पृथ्वी शॉला डावलल्याच्या चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात अनेकदा रंगल्या. दरम्यानच्या काळात पृथ्वी शॉने थेट इंग्लंडमधील रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. याच महिन्यात या स्पर्धेत खेळताना पृथ्वी शॉने 2 दमदार शतकं ठोकून अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र या स्पर्धेदरम्यान जखमी झाल्याने पृथ्वी या स्पर्धेतूनही बाहेर पडला. पृथ्वी डरहमच्या संघाविरुद्ध खेळताना जायबंदी झाला. जखमी झाल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. 

काय आहे इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये?

पृथ्वीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करताना, "जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जात असता तेव्हा लोक तुमची मदत करतात. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रसातळाला जात असता तेव्हा लोक तुमचा हात सोडतात," अशी कॅप्शन दिली आहे. त्याने गोलाकार शिड्यांवरुन उतरत असल्या फोटो पोस्ट करत त्यावर या ओळी लिहिल्या आहेत. या फोटोमध्ये गुडघ्याला जखम झाल्याने तेथे बांधलेलं बॅण्डएडही दिसत आहे. मात्र पृथ्वीने या वाक्यासहीत अशी स्टोरी का पोस्ट केली आहे याबद्दलची कोणतीच ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र अशा स्टोरींच्या माध्यमातून पृथ्वी निवडसमितीमधील लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो अशी चर्चा क्रिकेटच्या वर्तुळात आहे. 

अर्जून तेंडुलकरने केलेली पोस्ट

काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने सोशल मीडियावर पृथ्वीसाठी एक पोस्ट केली होती. पृथ्वीसोबतचा फोटो शेअर करत अर्जुनने, "ठणठणीत राहा माझ्या मित्रा. तू लवकरच ठीक होशील अशी आशा व्यक्त करतो," असं म्हटलेलं. अर्जुनने या पोस्टमध्ये पृथ्वीबरोबरच लहानपणीचा फोटोही शेअर केला होता. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.

कशी आहे पृथ्वीची कामगिरी?

पृथ्वी शॉने रॉयल लंडन वर्ल्डकपमध्ये 4 डावांत 143 च्या सरासरीने 429 धावा कुटल्या. यामध्ये 2 शतकांचा समावेश होता. डरहमविरुद्धच्या सामन्यात खेळताना पृथ्वीच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर तो स्पर्धेबाहेर गेला. भारतासाठी पृथ्वीने 5 कसोटी, 6 वनडे सामने आणि 1 टी-20 सामना खेळला आहे. त्याने टेस्टमध्ये 339, वनडेमध्ये 189 तर टी-20 मध्ये शून्य धावा केल्या आहेत. मात्र तो केवळ एकच टी-20 सामना खेळला आहे हे ही लक्षात घेणं महत्वाचं आहे.

संघात संधीची चर्चा

इंग्लंडमधील रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेतील कामगिरी पाहता पृथ्वी शॉला भारतीय संघामध्ये स्थान मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. त्याच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावरुन मागील काही दिवसांमध्ये अशापद्दतीची मागणी केल्याच पहायला मिळालं आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा होण्याआधीच पृथ्वीने अशी स्टोरी पोस्ट शेअर केल्याने उलटसुलट चर्चांनाही उधाण आलं आहे.