राहुल द्रविड भारत-ए आणि अंडर-१९ला प्रशिक्षक देणार नाही

भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारत-ए आणि भारताच्या अंडर-१९ टीमला प्रशिक्षण देणार नाही.

Updated: Aug 29, 2019, 02:58 PM IST
राहुल द्रविड भारत-ए आणि अंडर-१९ला प्रशिक्षक देणार नाही title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारत-ए आणि भारताच्या अंडर-१९ टीमला प्रशिक्षण देणार नाही. राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)च्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सितांशू कोटक यांना भारत-ए आणि पारस म्हामब्रे यांना अंडर-१९ टीमचा प्रशिक्षक करण्यात आलं आहे. पण पुढच्या काही महिन्यांसाठीच या कोटक आणि म्हामब्रे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राहुल द्रविडला २०१५ साली भारत-ए आणि अंडर-१९ टीमचा प्रशिक्षक बनवण्यात आलं होतं. भारत-ए टीमच्या प्रशिक्षकपदी निवड झालेले सितांशू कोटक सौराष्ट्रचे माजी बॅट्समन होते. कोटक हे भारत-ए टीमचे बॅटिंग आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. त्यांच्यासोबत भारताचे माजी ऑफ स्पिनर रमेश पोवार बॉलिंग प्रशिक्षक म्हणून असतील.

भारताचे माजी फास्ट बॉलर पारस म्हामब्रे सप्टेंबर महिन्यात कोलंबोमध्ये होणाऱ्या अंडर-१९ आशिया कपमध्ये मुख्य आणि बॉलिंग प्रशिक्षक असतील. म्हामब्रे यांनी द्रविडसोबत बराच काळ भारत-ए आणि अंडर-१९ टीमसाठी काम केलं. भारताचे माजी बॅट्समन ऋषीकेश कानेटकर आणि अभय शर्मा म्हामब्रेंसोबत असतील. या दोघांना बॅटिंग आणि फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.