पाकिस्तानसोबत न खेळल्यानं भारताचं वर्ल्ड कपमधील स्थान धोक्यात

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खराब असल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांमध्ये दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामने झाले नाहीत.

Updated: Feb 12, 2019, 04:18 PM IST
पाकिस्तानसोबत न खेळल्यानं भारताचं वर्ल्ड कपमधील स्थान धोक्यात title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खराब असल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांमध्ये दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामने झाले नाहीत. भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध आयसीसीच्या स्पर्धा सोडून कोणत्याच प्रकारचं क्रिकेट खेळत नाहीत. आयसीसीच्या महिला वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध सीरिज खेळायला नकार दिला, तर भारताचं २०२१ सालच्या वर्ल्ड कपमधलं स्थान धोक्यात येणार आहे.

वेस्टइंडिजविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तान पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भारत या टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि पाकिस्तानच्या टीमचे १२ पॉईंट्स आहेत, पण चांगल्या नेट रनरेट असल्यामुळे भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्धची मॅच न खेळण्याचा निर्णय भारतानं घेतला, तर भारताला ६ पॉईंट गमवावे लागतील आणि हेच ६ पॉईंट पाकिस्तानला देण्यात येतील.

महिला वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या फॉरमॅटनुसार यजमान न्यूझीलंड आणि पॉईंट्स टेबलमधल्या इतर ४ टीम अशा एकूण ५ टीमना २०२१ सालच्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळेल. उरलेल्या टीमना क्वालिफिकेशन राऊंड (प्ले ऑफ) खेळावं लागेल. यामध्ये जिंकलेल्या ४ टीमना २०२१ सालच्या वर्ल्ड कपमध्ये प्रवेश मिळेल.

आयसीसीच्या महिला वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये टॉप ८ टीम एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय सीरिज खेळतात. वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये १६ पॉईंटसह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड १४ पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

२०१७ साली १९ पॉईंट असलेली टीम पाचव्या क्रमांकावर वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाली होती. त्यामुळे भारताविरुद्धची सीरिज झाली नाही, तर पाकिस्तानला २०२१ सालच्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. २०१७ सालीही भारतानं पाकिस्तानविरुद्ध सीरिज खेळली नव्हती. यामुळे भारताला क्वालिफिकेशन राऊंडमध्ये प्ले ऑफ खेळून वर्ल्ड कपमधलं स्थान गाठावं लागलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १ विकेटनं विजय मिळवल्यामुळे भारत प्ले ऑफनंतर पहिल्या क्रमांकावर होता.