न्यूझीलंडच्या रॉस टेलरची विक्रमाला गवसणी

न्यूझीलंडचा बॅट्समन रॉस टेलरनं विक्रमाला गवसणी घातली आहे. 

Updated: Feb 20, 2019, 01:21 PM IST
न्यूझीलंडच्या रॉस टेलरची विक्रमाला गवसणी title=

ड्यूनेडिन : न्यूझीलंडचा बॅट्समन रॉस टेलरनं विक्रमाला गवसणी घातली आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेदरम्यान रॉस टेलर न्यूझीलंडचा वनडेमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. रॉस टेलरनं न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्टिफन फ्लेमिंग याच्या ८,००७ रनचा विक्रम मोडीत काढला आहे. या मॅचमध्ये रॉस टेलरनं ६४ रनची खेळी केली. याचबरोबर रॉस टेलर हा जलद ८ हजार रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथा खेळाडू ठरला आहे. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि सौरव गांगुली यांच्यानंतर आता रॉस टेलरनं सगळ्यात जलद ८ हजार रनचा टप्पा गाठला आहे.

रॉस टेलरनं २१८ वनडेच्या २०३ इनिंगमध्ये ४८.३२ च्या सरासरीनं ८,०२१ रन केल्या आहेत. २० शतकं आणि ४७ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये सर्वाधिक शतकं आणि अर्धशतकं त्याचबरोबर सर्वाधिक सरासरी असण्याचा विक्रमही रॉस टेलरच्याच नावावर आहे. न्यूझीलंडचे फ्लेमिंग(८,००७ रन), नॅथन ऍस्टल (७,०९० रन), मार्टिन गप्टील(६,४४० रन) आणि ब्रॅण्डन मॅक्कलम (६,०८३ रन) हे सर्वाधिक रन करणारे खेळाडू आहेत.

रॉस टेलर हा न्यूझीलंडकडून खेळताना सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला असला, तरी त्याला फ्लेमिंगचं रेकॉर्ड मोडायला आणखी ११ रनची गरज आहे. आयसीसी वर्ल्ड-११ कडून खेळताना फ्लेमिंगनं ३० रन केल्या होत्या. यामुळे फ्लेमिंगच्या एकूण रन या ८,०३७ आहेत.

बांगलादेशविरुद्धची ही वनडे वर्ल्ड कप आधीची न्यूझीलंडची शेवटची वनडे होती. यानंतर आता न्यूझीलंड थेट वर्ल्ड कपमध्येच मॅच खेळणार आहे. त्यामुळे रॉस टेलरला वर्ल्ड कपमध्ये फ्लेमिंगचं हे रेकॉर्ड मोडता येईल.