मुंबई : क्रिकेट विश्वात १६ मार्चला विशेष मह्त्व आहे. १६ मार्चला क्रिकेट विश्वातील महत्वाचे विश्वविक्रम केले गेले. हे विश्वविक्रम करणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर, नवज्योत सिंग सिद्धू, हर्षल गिब्स आणि नथन एस्टल यासारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी आजच्या दिवशी आपल्या खेळीने क्रिकेट विश्वातील काही मोठे रेकॉर्ड केले. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे १६ मार्च हा दिवस क्रिकेटप्रेमींच्या चांगलाच लक्षात आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ७ वर्षांपूर्वी म्हणजेच १६ मार्च २०१२ ला आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० वे शतक लगावले होते. ही शतकी खेळी तेंडुलकरने बांग्लादेश टीम विरुद्ध केली होती. सचिनने ११४ रनची खेळी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं करणारा सचिन हा एकमेव खेळाडू आहे. सचिनच्या या रेकॉर्डच्या जवळपास कोणीच नाही आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटध्ये विराट कोहलीच्या नावे एकुण ६६ शतकं आहेत. सर्वाधिक शतकं करणाऱ्यांच्या यादीत सचिननंतर कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
नवज्योत सिंह सिद्धूने १६ मार्च १९९७ ला वेस्टइंडिज विरुद्ध टेस्टमधील सर्वात संथ द्विशतक केले होते. ही टेस्ट मॅच १३ मार्च ते १७ मार्च दरम्यान खेळवण्यात आली होती. सिद्धूला द्विशतक पूर्ण करण्यासाठी तब्बल ६७३ मिनिटांचा अवधी मैदानावर घालवावा लागला होता. हे द्विशतक नवज्योत सिद्धूने ४९१ बॉलमध्ये पूर्ण केले होते. हे द्विशतक सिद्धूच्या टेस्ट कारकिर्दीतील एकमेव द्विशतक ठरले. ही टेस्ट ड्रॉ झाली होती.
२००७ च्या वर्ल्डकपचे वेस्ट इंडिजमध्ये आयोजन करण्यात आले होते. नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात १६ मार्चला झालेल्या मॅचमध्ये हर्षल गिब्सने सहा बॉलमध्ये सहा सिक्स लगावले होते. हर्षल गिब्सने डान वान बुंगे या स्पिनरच्या बॉलिगंवर सहा सिक्स मारले होते. या कामगिरी सोबतच तो सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारणारा वनडेतील पहिलाच खेळाडू ठरला. या मॅचमध्ये गिब्सने ४० बॉलमध्ये ७२ रनची खेळी केली होती. यात ७ सिक्स आणि ४ फोरचा समावेश होता.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात २००२ साली झालेल्या टेस्ट मध्ये वेगवान द्विशतक करण्याची कामगिरी न्यूझीलंडच्या नथन एस्टलने केली होती. नॅथनने १५३ बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केले होते. यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक लगावण्याची कामगिरी एस्टलने आजच्याच दिवशी १७ वर्षांपूर्वी केली होती. न्यूझीलंडला ही टेस्ट जिंकण्यासाठी ५५० रनचे आव्हान होते. न्यूझीलंडने मॅचच्या पाचव्या दिवसाच्या उपहारापर्यंत ३ विकेटच्या मोबदल्यात १२५ रन केले होते. तिसरी विकेट गमावल्यानंतर मैदानात आलेल्या एस्टलने १५३ बॉलमध्ये स्फोटक द्विशतक लगावले. हे द्विशतक टेस्टमधील सर्वात वेगवान द्विशतक आहे. एका ठिकाणी न्यूझीलंडचे विकेट जात असताना नॅथन एकटा खिंड लढवत होता. एस्टलच्या रुपात न्यूझीलंडने दहावी विकेट गमावली. एस्टल आऊट झाला तेव्हा न्यूझीलंडचा स्कोअर ४५१ इतका होता.