आयपीएलला धक्का, इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू १ मेपर्यंतच खेळणार

२०१९ सालच्या आयपीएलला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 6, 2018, 05:49 PM IST
आयपीएलला धक्का, इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू १ मेपर्यंतच खेळणार title=

मुंबई : २०१९ सालच्या आयपीएलला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू १ मेपर्यंतच आयपीएलमध्ये खेळतील, असं या दोन्ही बोर्डनी बीसीसीआयला सांगितलं आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरु होतोय. त्यामुळे या दोन्ही बोर्डांनी हा निर्णय घेतला आहे, असं वृत्त मुंबई मिररनं दिलं आहे.

याबाबत बीसीसीआयनं मात्र आयपीएल फ्रॅन्चायजीना याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही १२ मेपर्यंतच आयपीएलमध्ये खेळतील, अशा चर्चा आहेत. पण न्यूझीलंडचे खेळाडू संपूर्ण आयपीएल खेळतील, असं बोललं जातंय. खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत सगळी बोर्ड आयपीएल लिलावाआधी अधिकृत माहिती देतील.

१७-१८ डिसेंबरला आयपीएल लिलाव

यावर्षीचा आयपीएल लिलाव १७ आणि १८ डिसेंबरला जयपूरमध्ये होईल, असं वृत्तही मुंबई मिररनं दिलं आहे. याबाबत आयपीएल फ्रॅन्चायजीना माहिती देण्यात आली आहे. काही फ्रॅन्चायजीनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएलचं ठिकाण निश्चित झाल्यावरच लिलाव घेण्यात यावा, अशी मागणी काही फ्रॅन्चायजीनी केली आहे.

२०१९ साली भारतात होणाऱ्या निवडणुकांमुळे आयपीएलचे काही सामने युएई किंवा दक्षिण आफ्रिकेत खेळवले जाऊ शकतात. सुरक्षेच्या कारणास्तव या दोनपैकी एका ठिकाणी संपूर्ण आयपीएलही खेळवली जाईल, असं बोललं जातंय. याआधी २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलं. तर २०१४ साली आयपीएलचे सुरुवातीचे सामने युएईमध्ये झाले होते.

प्रत्येक वर्षी आयपीएल एप्रिलपासू खेळवली जाते. पण वर्ल्ड कपमुळे आयपीएल २९ मार्चलाच सुरु होणार आहे. आयपीएल फायनल १९ मेला होणार आहे.