टीम इंडियाला दुहेरी धक्के! ICC ची मोठी कारवाई अन् 'हा' खेळाडू झाला जखमी

WTC Points Table : सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत 2 ओव्हर कमी टाकल्याबद्दल भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचे दोन गुण देखील कापण्यात आले आहेत. यासह संघाला मॅच फीच्या 10 टक्के दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 30, 2023, 10:06 PM IST
टीम इंडियाला दुहेरी धक्के! ICC ची मोठी कारवाई अन् 'हा' खेळाडू झाला जखमी title=
IND vs SA 2nd Test

IND vs SA 2nd Test : साऊथ अफ्रिका आणि भारत (South Africa vs India) यांच्यातील पहिल्या सेंच्युरियन कसोटीत भारताचा तिसऱ्या दिवशी एक डाव आणि 32 धावांनी दारूण पराभव झाला. त्यामुळे मालिका विजयाचं स्वप्न अखेर अपूर्णच राहिलंय. मालिकेत आता साऊथ अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली असून आगामी सामन्यात त्यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. सामना गमावताच टीम इंडिला मोठा धक्का बसला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये (WTC Points Table) टीम इंडिया थेट पहिल्या स्थानावरून 5 व्या स्थानी पोहोचली होती. अशातच आता टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले आहेत.

आयसीसीची कारवाई

सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत 2 ओव्हर कमी टाकल्याबद्दल भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठीचे (WTC) दोन गुण देखील कापण्यात आले आहेत. यासह संघाला मॅच फीच्या 10 टक्के दंड देखील ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आता रोहितसेनेला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनल ऑफ मॅच रेफ्रीच्या ख्रिस ब्रॉड यांनी हा निर्णय दिला आहे. आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टच्या कलम 2.22 नुसार टीम इंडियाला हा दंड ठोठावण्यात आलाय. एका स्लो ओव्हर रेटसाठी 5 टक्के दंड आकारला जातो. त्यामुळे दोन ओव्हरच्या स्लो ओव्हर रेटमुळे मॅच फीच्या 10 टक्के दंड आकरण्यात आलाय.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडिया 16 गुणांसह 5 व्या स्थानी होती. मात्र, आता दोन अंकात घसरण झाल्याने टीम इंडिया 6 व्या स्थानी घसरली आहे. डब्लूटीसी पॉइंट टेबलमधील टीम इंडियाचं स्थान कमकुवत झाल्याने फायनलचा मार्ग किटकट होण्याची चिन्ह आहेत.

शार्दुल ठाकूर जखमी

एकीकडे आयसीसीची कारवाई होत असताना टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सराव करत होता. शार्दुल यावेळी फलंदाजीचा सराव करत असताना एक बाऊन्सर शार्दुलच्या दिशेने आला अन् त्याच्या खांद्यावर आदळल्याचं पाहायला मिळालं आहे. शार्दुलला बॉल लागल्यावर त्याचा जीव कासावीस झाला. त्यानंतर फिजीओंनी त्याला सांभाळलं अन् त्याच्या खांद्याला बर्फ लावला. त्यानंतर त्याने ड्रेसिंग रुमची वाट धरली. त्यामुळे आता शार्दुल आगामी सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल आता विचारला जात आहे.

आणखी वाचा -"विराट कोहलीला टेस्टचा कॅप्टन करा, कमकुवत रोहित शर्माने काय केलं?"

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतीमुळे आता केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला आहे. त्यामुळे आगामी सामन्यात डीन एल्गर संघाचं नेतृत्व करेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी शेवटच्या कसोटीमधून बाहेर झालाय.