दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला 'कुरतडलं'

बॉल कुरतडल्याच्या वादामुळे गाजलेली तिसरी टेस्ट दक्षिण आफ्रिकेनं तब्बल ३२२ रन्सनी जिंकली आहे.

Updated: Mar 25, 2018, 09:44 PM IST
दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला 'कुरतडलं' title=

केप टाऊन : बॉल कुरतडल्याच्या वादामुळे गाजलेली तिसरी टेस्ट दक्षिण आफ्रिकेनं तब्बल ३२२ रन्सनी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या ४३० रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची टीम १०७ रन्सवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक ३२ रन्स केल्या. तर दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्नी मॉर्कलनं ऑस्ट्रेलियाच्या ५ बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. या मॅचमध्ये ९ विकेट घेणाऱ्या मॉर्नी मॉर्कला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला आहे. या सीरिजची चौथी टेस्ट मॅच ३० एप्रिलपासून जोहान्सबर्गमध्ये सुरु होणार आहे.

वादामुळे गाजली टेस्ट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे. या दोघांनाही त्यांच्या पदावरून डच्चू देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं घेतला आहे. तर स्टिव्ह स्मिथवर आयसीसीनंही कारवाईचा बडगा उचलला आहे. स्मिथचं एका टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं आहे. तसंच त्याची १०० टक्के मॅच फी देखील कापण्यात आली आहे.

स्मिथची कबुली

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. पाचवेळच्या जगज्जेत्या संघानं कसोटी सामना जिंकण्यासाठी चेंडूशी छेडछाड करणं ही निश्चितच शर्मेंची बाब आहे. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं.

अशी झाली बॉलशी छेडछाड

दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करताना दिसला. चेंडूला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून चेंडूला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं. बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या चेंडूशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.

क्रिकेटची प्रतिमा झाली मलिन

ऑस्ट्रेलियन संघ नेहमीच सामना जिंकण्यासाठी स्लेजिंगचा वापर करत प्रतिस्पर्धी संघावर दबावतंत्र टाकायचा. आणि आातातर चेंडू कुरतडण्यापर्यंत या संघाची मजल गेलीय. यामुळे क्रिकेटविश्वात त्यांची प्रतिमा आणखी मलिन झालीय. सभ्य गृहस्थांचा खेळ अशी क्रिकेटशी ओळख. मात्र हा सभ्य गृहस्थांचा खेळ राहिलाय का असाच प्रश्न निर्माण झालाय. तसंच क्रिकेटमधील संघभावना यावरही सवाल उपस्थित झालाय.