क्रीडा क्षेत्रासाठी असं असणार २०१९

२०१९ मध्ये क्रीडाप्रेमींना क्रिकेट विश्वचषक, पहिली-वहिली कसोटी चॅम्पियनशिपची मेजवानी तर मिळणारच आहे.

Updated: Dec 26, 2018, 11:08 PM IST
क्रीडा क्षेत्रासाठी असं असणार २०१९ title=

मुंबई : २०१९ मध्ये क्रीडाप्रेमींना क्रिकेट विश्वचषक, पहिली-वहिली कसोटी चॅम्पियनशिपची मेजवानी तर मिळणारच आहे. शिवाय खेलो इंडियाच्या दुसऱ्या हंगामाचं आयोजन करण्याचा मान महाराष्ट्राला मिळालाय. आगामी वर्षात क्रीडाप्रेमींना वेगवेगळ्या खेळांची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.

२०१९ वर्ल्ड कप

इंग्लंडमध्ये जगभरातील अव्वल क्रिकेट टीममध्ये क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी घमासान रंगेल. क्रिकेटच्या दुनियेतील १० अव्वल टीममध्ये ४८ सामाने होणार आहेत. दरम्यान २०११चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा हा अखेरचा वर्ल्ड कप ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे धोनीसाठी हा वर्ल्ड कप जिंकण्याच्या उद्देशानचं भारतीय टीम मैदानात उतरेल. त्याचबरोबर या वर्ल्ड कपनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटू क्रिकेटला अलविदा करणार असल्याची चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगतेय.

टेस्ट चॅम्पियनशिप

वर्ल्ड कप संपल्यानंतर क्रिकेटप्रेमींना पहिल्या-वहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपचा थरार अनुभवता येईल. २१ जुलैपासून या चॅम्पियनशिपला सुरुवात होईल. आणि जून २०२१ मध्ये क्रिकेटविश्वाला इंग्लंडमध्ये मिळेल पहिली टेस्ट विश्वविजेती टीम.

विराट कोहलीचे रेकॉर्ड

विराट कोहलीनं २०१८ च्या क्रिकेट हंगामात आपल्या शतकांचा आणि खोऱ्यानं धावा काढण्याचा धडाका लावला होता. २०१९ मध्येही विराटला अनेक नवे विक्रम रचण्याची संधी आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर कोहली आणि किती विक्रम करतो याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.

खेलो इंडिया

खेलो इंडियाच्या दुसऱ्या हंगामाचं यजमानपद भूषवण्याची संधी महाराष्ट्राला मिळालीय. पुण्यात ९ जानेवारी ते २० जानेवारीदरम्यान ही स्पर्धा रंगेल. या स्पर्धेत २९ राज्यातील जवळपास १० हजार युवा खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमुळे देशरातील युवा क्रीडापटूंना चमकदार कामगिरी करुन दाखवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे.

पीव्ही सिंधू- सायना नेहवाल

पीव्ही सिंधूनं बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनल्स जिंकत २०१८ च्या बॅडमिंटन हंगामाचा शेवट गोड केला होता. आता २०१९मध्ये सिंधू पुन्हा एकदा बॅडमिंटनच्या दुनियेत भारताचा तिरंगा डौलानं फडकावण्यास आतूर असेल. तर सायना नेहवालही आपल्या खेळाची जादू दाखण्यास प्रयत्नशील असेल.

रॉजर फेडरर निवृत्त होणार?

गेल्या तीन वर्षांपासून टेनिसचा हंगामा सुरु झाला की, चर्चा रंगते ती स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या निवृत्तीची. फेडररनंही २०१९ मध्ये निवृत्तीबाबत विचार करेन असं सांगितलंय. त्यामुळे पुन्हा एकदा फेडेक्सच्या निवृत्तीच्या २०१९ मध्येही चर्चा या निश्चितच रंगणार आहेत. तसंच रॉजर फेडरर, राफाएल नदाल, नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे यांचं साम्राज्य खालसा करण्यात कुठल्या टेनिसपटूला यश मिळतं का ते पाहणही महत्त्वाचं ठरेल. तर महिलांमध्ये अमेरिकन टेनिस जायंट सेरेना विल्यम्सला मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाचा विक्रम खुणावतोय.

महिलांचा फूटबॉल वर्ल्ड कप

२०१९मध्ये महिलांचा फुटबॉल वर्ल्ड कप फ्रान्समध्ये होणार आहे. ७ जून ते ७ जुलैदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. यानिमित्तानं फ्रान्सला पहिल्यांदाच महिलांच्या फुटबॉल वर्ल्ड कपचं आयोजन कऱण्याची संधी मिळणार आहे.

रग्बी वर्ल्ड कप

जपानमध्ये २० सप्टेंबर ते २ नोव्हेंबरदरम्यान रग्बी वर्ल्ड कपचा थरार रग्बीप्रेमींना अनुभवात येईल. आशियात पहिल्यांदा यानिमित्तानं रग्बीचा वर्ल्ड कप होतोय. आणि जपान या रग्बी वर्ल्ड कपचं यशस्वी आयोजन करण्यास सज्ज आहे.

२०१८ प्रमाणे २०१९ मध्ये ऑलिम्पिक, फुटबॉल वर्ल्ड कप, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसारख्या मोठ्या स्पर्धा होणार नाहीत. क्रिकेट वर्ल्ड कपकडे त्यामुळे अवघ्या क्रीडा जगताच्या नजरा लागल्यात. आता २०१९ मध्ये कुठले नवी विक्रम रचले जातात आणि किती जुने विक्रम मोडले जातात याकडेच जगभरातील तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल.