...तर विराट स्मिथच्या पुढे जाणार

टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत.

Updated: Jul 30, 2018, 08:20 PM IST
...तर विराट स्मिथच्या पुढे जाणार title=

दुबई : टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत. १ ऑगस्टपासून या सीरिजची पहिली टेस्ट खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू स्टिव्ह स्मिथच्या पुढे जायची संधी आहे. आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर तर विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथ आणि कोहलीमध्ये २६ पॉईंट्सचा फरक आहे. आयसीसीच्या क्रमवारीमध्ये स्मिथच्या खात्यात ९२९ आणि कोहलीच्या खात्यात ९०३ पॉईंट्स आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये दमदार कामगिरी करून विराट वनडेबरोबरच टेस्ट क्रिकेटमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो.

इंग्लंडमध्ये विराटची खराब कामगिरी

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात खोऱ्यानं रन काढणाऱ्या विराटला इंग्लंडमध्ये संघर्ष करावा लागला आहे. विराट कोहलीचं इंग्लंडमधलं रेकॉर्ड पाहिलं तर तुम्हालाही धक्का बसेल. इंग्लंडमध्ये विराट कोहलीपेक्षा भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्राचं रेकॉर्ड चांगलं आहे.

२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताचा ३-१नं पराभव झाला होता. या सीरिजमध्ये कोहलीनं ५ मॅचमध्ये १३.४० च्या सरासरीनं १३४ रन केले. यातल्या २ वेळा कोहली शून्य रनवर आऊट झाला. याच सीरिजमध्ये भुवनेश्वर कुमारनं २७.४४ च्या सरासरीनं २४७ रन केले. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

भुवनेश्वर कुमारच नाही तर अमित मिश्रानंही इंग्लंडमध्ये विराटपेक्षा जास्त रन केले आहेत. २०११ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये अमित मिश्रा भारतीय टीममध्ये होता. या सीरिजच्या २ मॅचमध्ये मिश्रानं ३८.२५ च्या सरासरीनं १५३ रन केले होते. यामध्ये एक अर्धशतक होतं.