'धोनी-रोहितमुळे विराट चांगला कर्णधार'; गंभीरचा निशाणा

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पुन्हा एकदा विराट कोहलीच्या कर्णधारपदावर निशाणा साधला आहे.

Updated: Sep 20, 2019, 08:36 AM IST
'धोनी-रोहितमुळे विराट चांगला कर्णधार'; गंभीरचा निशाणा title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पुन्हा एकदा विराट कोहलीच्या कर्णधारपदावर निशाणा साधला आहे. कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगला कर्णधार आहे, पण आयपीएलमधल्या त्याच्या कर्णधारपदावर गंभीरने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गंभीरने विराटच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये चांगला कर्णधार असल्याचं श्रेय धोनी आणि रोहितला दिलं आहे.

'विराटने वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली. टीममध्ये रोहित आणि धोनीसारखे खेळाडू आहेत. या खेळाडूंमुळे विराट चांगला कर्णधारपद भुषवतो. या खेळाडूंमुळे विराट चांगला कर्णधार वाटतो,' असं गंभीर म्हणाला.

इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देणारे प्रशिक्षक माईक हेसन यांची आयपीएलमध्ये बंगळुरू टीमच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. आयपीएलच्या पुढच्या मोसमात विराटचं बंगळुरूचा कर्णधार राहिल, असं माईक हेसन यांनी स्पष्ट केलं आहे, तेव्हाच गंभीरने हे वक्तव्य केलं आहे.

'आयपीएलला अजून वेळ आहे. आयपीएल सुरु होईल तेव्हा विराटचा कर्णधार म्हणून कस लागेल. आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये खेळाडू जेवढे कर्णधाराला मदत करतात तेवढे आयपीएलमध्ये टीमच्या कर्णधारांना त्यांचे खेळाडू मदत करत नाहीत. त्यामुळे विराटचं आयपीएलमधलं नेतृत्व आंतरराष्ट्रीय मॅचसारखं असेलच असं नाही,' असं मत गंभीरने व्यक्त केलं आहे.

'रोहित शर्माने मुंबईसाठी आणि धोनीने चेन्नईसाठी काय मिळवलं आहे? आणि विराटने बंगळुरूसाठी काय मिळवलं? तुम्ही तुलना केल्यावर फरक दिसेल,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली आहे.