ऑस्ट्रेलियाला कमी लेखणार नाही- विराट कोहली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीच्या भारतीय टीमचं पारडं जड असेल.

Updated: Dec 5, 2018, 10:59 PM IST
ऑस्ट्रेलियाला कमी लेखणार नाही- विराट कोहली title=

ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये विराट कोहलीच्या भारतीय टीमचं पारडं जड असेल. गुरुवारी ६ डिसेंबरपासून या मॅचला सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे ५.३० वाजता या मॅचला सुरुवात होईल. स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला भारताला रोखणं चांगलचं कठीण जाणार आहे. ऍडलेड ओव्हलची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देणारी ठरणार आहे. दरम्यान, कर्णधार कोहलीनं आम्ही कांगारुंना कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचं म्हटलंय.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी अॅडलेड ओव्हलवर रंगणार आहे. या सामन्यात कोहली अतिम अकरामध्ये कुणाला स्थान देणार याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असेल. तर कांगारुंसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असेल.

भारतीय टीमची मदार ही बॅट्समनवर असेल. कर्णधार विराट कोहली या सामन्यात प्रमुख आकर्षण ठरणारच आहे. शिवाय इतर बॅट्समनही कांगारुंसाठी डोकेदुखी ठरणार आहे. सराव सामन्यात भारतीय बॅट्समननी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे ही बाब निश्चितच टीम इंडियाच्या पथ्यावरच पडणार आहे.

स्टिव्ह स्मिथ आणि वॉर्नर नसल्यानं ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था आधीच बिकट झालीय. त्यामुळे त्यांच्या टीमची या सामन्यात चांगलीच कसोटी लागणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामने नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरतात. आता भारतीय टीम कांगारुंना भारी ठरणार की, ऑस्ट्रेलियन टीम मायदेशात आपलं वर्चस्व कायम राखणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

ऍडलेडच्या मैदानात भारतानं आत्तापर्यंत ११ टेस्ट मॅच खेळल्या. यातल्या एकाच टेस्ट मॅचमध्ये भारताला विजय मिळाला होता. १५ वर्षांपूर्वी राहुल द्रविडचं द्विशतक आणि अजित आगरकरच्या बॉलिंगमुळे या मैदानात भारत जिंकला होता. ऍडलेडमध्ये भारत ७ मॅच हारला आहे तर ३ मॅच ड्रॉ झाल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत ९४ टेस्ट मॅच झाल्या आहेत. यातल्या ४१ मॅच ऑस्ट्रेलियानं आणि २६ मॅच भारतानं जिंकल्या. भारतानं २६ पैकी ५ टेस्ट मॅच ऑस्ट्रेलियात तर उरलेल्या मॅच मायदेशात जिंकल्या.

मागच्या ७० वर्षांमध्ये भारत ११ वेळा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. यातल्या फक्त २ सीरिज भारताला ड्रॉ करता आल्या. पहिले १९८०-८१ मध्ये सुनील गावसकर यांच्या नेतृत्वात आणि २००३-०४ साली गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं सीरिज ड्रॉ केली होती.

भारतीय टीम

विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियाची टीम

टीम पेन(कर्णधार), जॉस हेजलवूड, मिचेल मार्श, पॅट कमिन्स, एरॉन फिंच, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, मार्कस हॅरिस, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, पीटर सीडल, मिचेल स्टार्क, क्रिस ट्रेमन