राजकारण की क्रिकेट कोच होणार?; निवृत्तीनंतर हरभजन म्हणतो...

भारतीय टीमचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहने सर्व फॉरमॅटमधील क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे.

Updated: Dec 25, 2021, 12:20 PM IST
राजकारण की क्रिकेट कोच होणार?; निवृत्तीनंतर हरभजन म्हणतो... title=

मुंबई : भारतीय टीमचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहने सर्व फॉरमॅटमधील क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे. तर आता क्रिकेटमधील निवृत्तीनंतर हरभजनची नवी इनिंग काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निवृत्तीनंतर हरभजन कोच होणार की राजकारणात येणार याबद्दल चर्चाही रंगल्या. दरम्यान यासंदर्भात खुद्द आता हरभजननेच खुलासा केला आहे.

निवृत्तीनंतर म्हणाला की, "मी राजकारणाच्या विरोधात नाहीये, मात्र राजकारणाच्या मैदानात उतरण्याचा अंतिम निर्णय मी काळजीपूर्वक विचार करून घेऊ इच्छितो."

गेल्या काही दिवसांपूर्वी नवजोत सिंह सिद्धू यांच्यासोबतचा हरभजनचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी हरभजन आता राजकारण उतरणार असं अनेकांनी म्हटलं होतं. 

हरभजनसोबतचा हा फोटो सिद्धू यांनी ट्विटरवर शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना सिद्धू यांनी लिहिलं होतं की, ‘‘संभावनाओं से भरी तस्वीर’’. मात्र हरभजनने यासंदर्भात अजून काहीही निर्णय घेतलेला नाही.

भविष्याचा निर्णय घेण्यासाठी वेळ हवा

हरभजनने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं की, "पुढे काय होईल हे मला माहीत नाही. मला नेमक्या कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे हे समजण्यासाठी 2-3 दिवस लागतील. आणि होय, मला समाजाला काहीतरी परत करायचं आहे."

तो म्हणाला की, "जर मी राजकारणात प्रवेश केला तर कसा आणि कोणत्या मार्गाने, मला या गोष्टींचाही विचार करावा लागेल. कारण मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तर लोकांना मदत करणं हे माझं मुख्य ध्येय आहे."

क्रिकेटमध्ये व्यस्त राहू शकतो हरभजन

तज्ज्ञांच्या म्हणणे आहे की, हरभजन पंजाब विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याच्याकडे काही क्रिकेट आणि मीडिया कमिटमेंट्स आहेत ज्यामध्ये तो व्यस्त राहील. 

हरभजन म्हणाला की, "जोपर्यंत क्रिकेटचा संबंध आहे, मी खेळाशी जोडलेला असेन. मी आयपीएल टीम्ससाठी प्रशिक्षक बनू शकतो किंवा त्यांचा मार्गदर्शक होऊ शकतो."