रमेश पोवारवरून भारतीय टीममधला वाद आणखी वाढला

 भारतीय महिला टीममध्ये प्रशिक्षक रमेश पोवारवरून वाद वाढतच चालला आहे.

Updated: Dec 3, 2018, 11:45 PM IST
रमेश पोवारवरून भारतीय टीममधला वाद आणखी वाढला title=

मुंबई : भारतीय महिला टीममध्ये प्रशिक्षक रमेश पोवारवरून वाद वाढतच चालला आहे. रमेश पोवारच्या बीसीसीआयसोबतच्या कराराचा वादग्रस्त अंत झाला. यानंतर आता टी-२० टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधनानं रमेश पोवारचं समर्थन केलं आहे. या दोघींनी रमेश पोवारच्या पुनरागमनासाठी बॅटिंग केली आहे. रमेश पोवारचा अंतरिम प्रशिक्षक म्हणून असलेला कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला आहे. मिताली राजसोबतच्या मतभेदांमुळे पोवारचा करार वाढवण्यात आला नसल्याचं बोललं जातंय.

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधना यांनी रमेश पोवारला २०२१ पर्यंत प्रशिक्षकपदावर कायम ठेवण्याचं समर्थन केलं आहे. याबद्दलचं पत्र त्यांनी लिहिलं आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिली आहे. बीसीसीआयनं याआधीच या पदासाठी नवीन अर्ज मागवले आहेत. रमेश पोवारलाही यासाठी अर्ज करता येणार आहे.

हरमनप्रीत आणि स्मृतीनं रमेश पोवारचा कार्यकाळ वाढवण्याचं समर्थन केलं असलं तरी एकता बिष्ट आणि मानसी जोशी यांच्याशिवाय वनडे टीमची कर्णधार मिताली राजनं रमेश पोवारच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला आहे.

काय आहे हरमनप्रीतच्या पत्रात?

हरमनप्रीतनं लिहिलेल्या पत्रामध्ये रमेश पोवारचं समर्थन करण्यात आलं आहे. भविष्यातही रमेश पोवारला भारतीय टीमचा प्रशिक्षक म्हणून कायम ठेवावं. पुढच्या टी-२० वर्ल्ड कपला फक्त १५ महिने बाकी आहेत. न्यूझीलंडचा दौराही आता एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. रमेश पोवार यांच्यामुळे टीममध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे त्यांना बदलण्याचं कोणतंच कारण मला दिसत नाही, असं पत्र हरमनप्रीत कौरनं लिहीलं आहे.

ऑगस्टमध्ये रमेश पोवारची नियुक्ती झाल्यानंतर भारतीय टीममध्ये अनेक सुधारणा झाल्या. सेमी फायनलमध्ये आमचा पराभव झाल्यामुळे आम्हाला दु:ख झालं. पण आमच्या अडचणी वाढल्या. आमच्या प्रतिमेलाही यामुळे धक्का लागल्याचं हरमनप्रीत आणि स्मृतीनं बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात म्हणलं आहे.