World Cup 2019 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर शोएब मलिक ट्रोलर्सवर संतापला

वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध झालेला पराभव पाकिस्तानच्या चाहत्यांच्या जास्तच जिव्हारी लागला आहे.

Updated: Jun 18, 2019, 05:31 PM IST
World Cup 2019 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर शोएब मलिक ट्रोलर्सवर संतापला title=

मॅनचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध झालेला पराभव पाकिस्तानच्या चाहत्यांच्या जास्तच जिव्हारी लागला आहे. सोशल मीडियावरून पाकिस्तानी चाहते त्यांच्या खेळाडूंवर जोरदार टीका करत आहेत. या टीका पाहून पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक चांगलाच संतापला आहे. शोएब मलिकने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'मीडिया आणि लोकांनी खेळाडूंच्या परिवाराचा सन्मान करावा. आमच्या कुटुंबाला कारण नसताना यामध्ये ओढलं जात आहे. ही चांगली गोष्ट नाही,' असं ट्विट शोएब मलिकने केलं आहे.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर शोएब मलिकची पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झालाही लक्ष्य करण्यात आलं. भारत-पाकिस्तान मॅचआधी शोएब मलिक आणि सानिया मिर्झा पाकिस्तानी टीममधल्या काही खेळाडूंना घेऊन हॉटेलमध्ये गेले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भारताविरुद्धच्या मॅचआधी पाकिस्तानी टीमचं लक्ष विचलित करण्यासाठी सानिया खेळाडूंना हॉटेलमध्ये घेऊन गेल्याचे आरोप पाकिस्तानी ट्विटर यूजर्सनी केले.

शोएब मलिकसोबतच पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरनेही पाकिस्तानी चाहत्यांसाठी एक ट्विट केलं आहे. 'खेळाडूंसाठी वाईट शब्दांचा वापर करु नका, अशी माझी विनंती आहे. आम्ही पुनरागमन करु, यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे,' असं ट्विट मोहम्मद आमिरने केलं आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने ५ पैकी फक्त १ मॅच जिंकली आहे, तर ३ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आणि १ मॅच पावसामुळे रद्द झाली. पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तानच्या खात्यात ३ पॉईंट्स आहेत. पाकिस्तानचा पुढचा सामना २३ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेशाचं आव्हान कायम ठेवायचं असेल तर पाकिस्तानला उरलेल्या चारही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. याचसोबत त्यांना इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.