रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्डकप जिंकेल का? महेंद्रसिंह धोनी म्हणाला 'जे हुशार आहेत....'

भारतीय संघाने शेवटचा वर्ल्डकप 2011 मध्ये जिंकला होता. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचं नेतृत्व करत होता.   

शिवराज यादव | Updated: Oct 27, 2023, 11:10 AM IST
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्डकप जिंकेल का? महेंद्रसिंह धोनी म्हणाला 'जे हुशार आहेत....' title=

MS Dhoni World Cup 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. वर्ल्डकपमध्ये भारत एकमेक संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. सलग 5 विजयांसह भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताची गुणसंख्या 10 असून, आणखी एका विजयासह भारताचं सेमी-फायनलमधील स्थान निश्चित होणार आहे. भारताच्या या कामगिरीमुळे क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या असून, वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 

रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आयसीसी स्पर्धा जिंकत मागील अनेक वर्षांपासूनचा दुष्काळ संपवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारताने शेवटची आयसीसी स्पर्धा 2013 मध्ये जिंकली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. तसंच शेवटचा वर्ल्डकप भारताने 2011 मध्ये जिंकला होता. त्यावेळीही महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. 

यामुळे महेंद्रसिंह धोनी याचं म्हणणं काय आहे याला महत्त्व आहे. दरम्यान वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना धोनीने पहिल्यांदाच भारतीय संघाच्या कामगिरीवर भाष्य केलं असून, वर्ल्डकपप जिंकण्याची कितपत शक्यता आहे यावर मत मांडलं आहे. 

"हा फार चांगला संघ आहे. संघात चांगला समतोल साधण्यात आला आहे. आपले खेळाडू फार चांगले खेळत आहेत. त्यामुळे सर्वकाही चांगलं दिसत आहे. त्यापेक्षा मी जास्त काही बोलणार नाही. हुशार व्यक्तीला इशाराच भरपूर आहे," असं महेंद्रसिंह धोनीने सांगितलं आहे. तो एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. 

असं अनेकदा म्हटलं जातं की, भारतीय संघाने सचिन तेंडुलकरसाठी 2011 चा वर्ल्डकप खेळला होता. त्यामुळेच त्यांनी तो जिंकत सचिन तेंडुलकरचं स्वप्न पूर्ण केलं होतं. तर सध्या विराट कोहलीसाठी वर्ल्डकप जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. पण हरभजन सिंगला विचारण्यात आलं असता, त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या. इंडिया टुडेशी बोलताना त्याने सांगितलं की, "2011 मध्ये वर्ल्डकपचा संघ जितका एकत्र होता, तितका हा संघ असल्याचं मला वाटत नाही".

"या दोन्ही संघात फार मोठं अंतर आहे. 2011 चा संघ जास्त जोडलेला होता. त्यांना सचिन तेंडुलकरसाठी वर्ल्डकप जिंकायचा होता. पण या संघाबद्दल मला खात्री नाही. या सर्वांना विराट कोहलीसाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे का, याची मला माहिती नाही. पण त्यांना भारतासाठी जिंकायचा आहे हे नक्की. यात मोठा फरक आहे," असं हरभजन म्हणाला. 

आपला मुद्दा स्पष्ट करताना हरभजनने सांगितलं की, संपूर्ण संघ सचिन तेंडुलकरचा इतका आदर करत होतं की, त्यांना त्याच्यासाठी वर्ल्डकप जिंकायचा होता. पण सध्याचे खेळाडू विराट कोहलीवरुन एकजूट आहेत का हे मला माहिती नाही.