VIDEO: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी लिक केले बाबर आझमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट

Babar Azam WhatsApp chat leaked: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापन समितीचे प्रमुख झका अश्रफ यांनी रविवारी रात्री उशिरा बाबर आझमचे वैयक्तिक व्हॉट्सअॅप चॅट लाइव्ह टीव्हीवर लीक केले आहेत.

आकाश नेटके | Updated: Oct 30, 2023, 09:38 AM IST
VIDEO: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी लिक केले बाबर आझमचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट title=

World Cup 2023 : पाकिस्तानच्या (Pak) संघासाठी यंदाचा वर्ल्डकप खूपच निराशाजनक ठरला आहे. यासोबत पाकिस्तानच्या संघामध्येही (Team Pakistan) काही आलबेल नाहीये असचं दिसत आहे. दुसरीकडे कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यातील दुरावा देखील आणखी वाढलेला दिसत आहे. हे सगळं नाटक एकदिवसीय वर्ल्डकपच्या मध्यावर घडत आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या खराब प्रदर्शनानंतर बाबर आझमला कर्णधारपदावरून दूर केलं जाण्याची शक्यता असताना, त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आलं आहे. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ (zaka ashraf) यांनी एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आणून खळबळ उडवून दिली आहे.

पाकिस्तानचा माजी खेळाडू रशीद लतीफने दावा केला होता की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांनी कर्णधार बाबर आझम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी बाबरच्या कॉल किंवा मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र, रशीद लतीफच्या दाव्यांना उत्तर देताना अश्रफ यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्य सांगितलं आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने माझ्याशी कधीही थेट संपर्क साधला नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांनी म्हटलं आहे. 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाची खराब कामगिरी सुरूच आहे. दुसरीकडे संघातील खेळाडूंना गेल्या काही महिन्यांपासून वेतनही मिळालेले नाही, अशीही माहिती समोर आली होती. त्यातच पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक रशीद लतीफ याने शनिवारी दावा केला होता की  झका अश्रफ यांनी बाबर आझमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर झका अश्रफ यांनी बाबर आझमसोबतचे चॅट समोर आणून खरं काय ते सांगितलं आहे.

अश्रफ यांनी म्हटलं की, 'त्याने (लतीफ) सांगितले की मी बाबरचे फोन उचलत नाही. त्याने मला कधीही फोन केला नाही. संघाच्या कर्णधाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलणे आवश्यक आहे.' बाबर आझमने फोन केल्याच्या बातम्या फेटाळून लावत अश्रफने व्हॉट्सअॅप चॅटच समोर आणले. हे व्हॉट्सअॅप चॅट बाबर आझम आणि पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नसीर यांच्यातील होते.

काय आहे व्हॉट्सअॅप चॅटमध्ये?

या चॅटमध्ये नसीर बाबर आझमला प्रश्न विचारताना दिसत आहे. 'बाबर, टीव्ही आणि सोशल मीडियावर बातम्या येत आहेत की तू अध्यक्षांना फोन करत आहे आणि ते उत्तर देत नाहीत. तू त्यांना अलीकडेच फोन केला होतास का?', असा सवाल नसीर यांनी विचारला. याला उत्तर देताना बाबरने, 'सलाम सलमान भाई, मी सरांना कोणताही फोन केलेला नाही,' असं म्हटलं आहे.

दरम्यान, बाबर आझमने पीसीबी प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नसल्याचे या चॅटमधून स्पष्ट झाले आहे. मात्र हे चॅट सार्वजनिक करण्यासाठी बाबर आझमकडून परवानगी घेण्यात आली होती का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.