'कोहलीला सचिनचा विक्रम मोडण्याची गरज नाही कारण...'; 49 व्या शतकानंतर पॉण्टींगचं विधान

Virat Kohli Sachin Tendulkar Record: विराट कोहलीने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर वाढदिसवाच्या दिवशीच संयमी शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2023, 02:05 PM IST
'कोहलीला सचिनचा विक्रम मोडण्याची गरज नाही कारण...'; 49 व्या शतकानंतर पॉण्टींगचं विधान title=
आयसीसीबरोबर बोलताना पॉण्टींगचं विधान

Virat Kohli Sachin Tendulkar Record:  भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान कोलकात्यामधील ईडन गार्डन्सच्या मैदानावर रविवारी, 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये विराट कोहलीने ऐतिहासिक शतक झळकावलं. विराट कोहलीने 121 बॉलमध्ये नाबाद 101 धावा झळकावत सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय सामन्यांमधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटचं हे एकदिवसीय सामन्यातील 49 वं शतक ठरलं. विराटने परिस्थितीचा अंदाज घेत केलेल्या संयमी खेळीमुळे भारताला 326 धावांपर्यंत मजल मारता आली. 327 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 83 धावांवर बाद करत सामना 243 धावांनी जिंकला. भारताचा हा स्पर्धेमधील 8 वा विजय ठरला. 

विराटवर कौतुकाचा वर्षाव

विराट कोहलीने झळकावलेलं शतक हे पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. खुद्द सचिन तेंडुलकरपासून ते अगदी रिकी पॉण्टींगपर्यंत अनेक माजी क्रिकेटपटूंनी विराटचं कौतुक केलं आहे. सध्या 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या रिकी पॉण्टींगने सचिनचं तोंड भरुन कौतुक केलं. वाढदिवसाच्या दिवशीच विराटने केलेली ही कामगिरी पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच तो आता लवकरच 50 वं एकदिवसीय शतक झळकावून सचिनचा विक्रम मोडीत काढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या साऱ्या चर्चेदरम्यान पॉण्टींगने नोंदवलेली प्रतिक्रिया अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

दोघांविरुद्धही खेळलाय पॉण्टींग

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंविरोधात खेळलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मोजक्या खेळाडूंमध्ये पॉण्टींगचा समावेश होतो. सचिन विरोधात खेळताना आपल्या नेतृत्व गुणांनी सामना वळवण्याची धमक ठेवणारा पॉण्टींग करिअरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विराट कोहलीचा सामवेश असलेल्या भारतीय संघाविरुद्धही चमकादार कामगिरी करताना दिसला. दोन्ही खेळाडूंबद्दल पॉण्टींगच्या मनात प्रचंड आदर असला तरी दोघांपैकी उत्तम कोण याबद्दल बोलताना पॉण्टींगने आपलं मत विराटच्या पारड्यात टाकलं आहे.

त्याला सचिनचा विक्रम मोडण्याची गरज नाही

"तो सर्वोत्तम आहे यात काही शंका नाही. मी यापूर्वीही अनेकदा याबद्दल बोललो आहे. त्याने सचिनच्या विक्रमाची बरोबर करण्याची गरज नाही. त्याने सचिनचा विक्रम मोडण्याचीही गरज नाही. कारण तुम्ही केवळ त्याच्या फलंदाजीची एकंदरित आकडेवारी पाहिली तर ती अविश्वसनिय आहे हे तुम्हाला दिसेल. त्याने सचिनइतकीच 49 शतकं 175 डाव कमी खेळून झळकावली हा विचारच अविश्वसनिय आहे," असं म्हणत पॉण्टींगने 'आयसीसी'शी बोलताना विराटचं कौतुक केलं. 

विराट सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरा

वर्ल्ड कप 2023 मध्ये सध्या सर्वात यशस्वी फलंदाजांच्या यादीमध्ये विराट कोहलीचं नाव आवर्जून घेतलं जात आहे. विराट कोहली सध्याच्या घडीला वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. केवळ 4 शतकं झळकावणारा क्विंटन डी कॉक हा विराटपेक्षा केवळ 7 धावा पुढे आहे. कोहलीने वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतील भारताचा शेवटचा सामना होण्याआधी 543 धावा पूर्ण केल्या आहेत. यामध्ये 2 शतकांचा आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

विराटची भन्नाट कामगिरी सुरुच राहणार

विराट कोहलीचा वर्ल्ड कप 2023 मधील करिष्मा संपलेला नाही असं पॉण्टींगचं मत आहे. "तो सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी अधिक कष्ट घेत होता. अखेर त्याच्या मानेवरुन हे अपेक्षांचं ओझं उतरलं आहे. तो अगदी उत्तम वेळेस यामधून बाहेर पडला आहे. अजून एका सामन्यानंतर ते सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. भारतासाठी आणि विराटसाठी हा एक उत्तम दिवस होता," असं पॉण्टींगने म्हटलं आहे.