सात नव्हे, आठ फेरे मारत बबिता फोगाट विवाहबंधनात

रविवारी त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला.

Updated: Dec 2, 2019, 01:45 PM IST
सात नव्हे, आठ फेरे मारत बबिता फोगाट विवाहबंधनात title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

नवी दिल्ली : कुस्तीच्या खेळात पुरुषांच्या बरोबरीने उतरत या खेळावर आपलं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या 'दंगल गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बबिता फोगाट हिच्या जीवनातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. कुस्ती या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करणारी बबिता फोगाट हिने कुस्तीपटू विवेक सुहाग याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.  

रविवारी त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. कुटुंब, मित्रपरिवार आणि पाहुणे मंडळी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात सात नव्हे, तर आठ फेरे घेत या दोघांनी एकमेकांना सहजीवनाची साथ देण्याचं वचन दिलं. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', असा अतीशय महत्त्वाचा संदेश देत त्यांनी हा आठवा फेरा घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

बलाली या गावी, अतिशय स्तुत्य अशा विचाराने पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची साऱ्या क्रीडा विश्वात आणि नजीकच्या गावांमध्ये बरीच चर्चा सुरु आहे. बबिता आणि विवेक हे त्यांच्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने सुरेख पेहरावामध्ये दिसले. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या लग्नातील लेहंग्याप्रमाणे अगदी मिळताजुळता लेहंगा बबिताने घातला होता. तर, विवेकने साजेशी शेरवानी घातली होती. 

सर्व चालीरितींप्रमाणे पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मानपानाच्या रुपात कोणत्याही स्वरुपात हुंडा घेतला गेला नाही. या विवाहसोहळ्यानंतर आता दिल्लीमध्ये एका खास स्वागत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये कुस्तीतील काही प्रसिद्ध चेहरे आणि देशाच्या राजकारमातील महत्त्वाच्या व्यक्तींसह खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.