10 वी पास तरुण सतत बदलायचा WhatsApp DP; पोलिसांनी छापा टाकला अन् ते थक्कच झाले; कारण..

Youth Change WhatsApp DP Police Raid: पोलिसांनी या प्रकरणामध्ये अनेक दिवस तांत्रिक तपास सुरु ठेवला होता. काहीही ठोस हाती लागत नसताना पोलिसांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर त्यांच्या हाती काही धागेदोरे लागले आणि तो आरोपीपर्यंत पोहोचले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 25, 2024, 11:32 AM IST
10 वी पास तरुण सतत बदलायचा WhatsApp DP; पोलिसांनी छापा टाकला अन् ते थक्कच झाले; कारण.. title=
पोलिसांनी अनेक दिवसांच्या तपासानंतर आरोपीला पकडलं

Youth Change WhatsApp DP Police Raid: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. हाथरस पोलिसांच्या सायबर सेल आणि सर्व्हिलन्स सेलने संयुक्तरित्या केलेल्या एका कारवाईत स्वत:ला पोलीसवाला असल्याचं सांगून लोकांना फसवणाऱ्या एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा वेगवगेळ्या गुन्ह्यांअंतर्गत अडकवण्याची धमकी देत सायबर फसवणूक करुन लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा सदस्य आहे. आरोपीकडून 8 मोबाईल फोन, 5 आधार कार्ड, 3 एटीएम कार्ड आणि 11 लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली आहे. जेव्हा पोलिसांनी आरोपीला अटक केली तेव्हा तो तरुण 11 लाखांची कॅश बॅगेतून घेऊन मथुरेला जात होता. आरोपीने पोलिसांना यानंतर जे काही सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्काच बसला.

घातला 12 लाखांचा गंडा

पीडित संजय कुमार अग्रवाल यांना 6 जानेवारी 2024 रोजी मोबाईलवर व्हॉट्सअपवरुन कॉल आला. कॉल उचलल्यानंतर एका व्यक्तीने तुमच्या मुलाने गुन्हा केला असून त्या मोबदल्यात तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं सांगितलं. संजयन यांनी घाबरुन त्यांच्या खात्यावरुन 12 लाख रुपये ऑनलाइन माध्यमातून ट्रान्सफर केले. संजय कुमार अग्रवाल यांचा मुलगा कोटा येथे इंजीनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. मात्र नंतर संजय यांना त्यांच्या मुलाने कोणताच गुन्हा केला नाही असं समजलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. आपली सायबर फसवणूक झाल्याचं संजय यांच्या लक्षात आलं. त्यांनी हाथरस पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदवली. पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेतला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी निरीक्षकांना आणि सायबर सेलला कामाला लावलं. तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हेगारांचा शोध सुरु झाला. पोलिसांनी अनेक दिवस तांत्रिक तपास सुरु ठेवला. वेगवगेळ्या बँक खात्यांवरुन लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा एक सदस्य अखेर पोलिसांच्या हाती लागला. आरोपीकडून 8 मोबाईल फोन, 5 आधार कार्ड, 3 एटीएम कार्ड आणि 11 लाख 78 हजार 370 रुपये कॅश जप्त करण्यात आली. 

पैसे वळवून घेतले

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो 10 वी पर्यंत शिकलेला आहे. आरोपीची ओळख भोपाळमधील रहिवाशी असलेल्या अंतर सिंह यादव आणि संतोष घोसलेबरोबर झाली. या दोघांनी आरोपीला काही बँकांमध्ये खाती सुरु करुन दिली. पोलीस असल्याचं खोटं सांगून या तिघांनी हाथरसमधील एका व्यक्तीबद्दलची बरीचशी माहिती गोळा केली. या व्यक्तीच्या मुलाला आरोपी असल्याचं सांगून त्याच्याकडून 12 लाख उकळले. वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम तुकड्या तुकड्यांमध्ये वळून घेण्यात आली. तिथून हे पैसे या तिघांनीही आपआपल्या बँक खात्यांवर नेट बँकिंग आणि यूपीआयच्या माध्यमातून वळते केले. हेच पैसे घेऊन आरोपी मथुरेला जात होता.

अशी होती कामाची पद्धत

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी ओळखीच्या लोकांकडून बोलता बोलता शहरातील कोणत्या घरांमधील मुलं वेगवेगळ्या शहरांमध्ये शिकण्यासाठी गेले आहेत याची माहिती काढायचे. त्यानंतर खोटे पोलीस बनून, बनावट आयकार्डच्या मदतीने धमकावून या मुलांच्या नावाखाली आरोपी त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळायचे. हे आरोपी या मुलांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांचा संपूर्ण ताबा घ्यायचे. बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड आणि मोबाईलही हे ठेऊन घ्यायचे. यामुळे खऱ्या पोलिसांकडे हे पीडित जाणार नाही अशी सोय व्हायची असं आरोपीने सांगितलं. या रॅकेटचा भांडाफोड करुन आरोपीला अटक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे हाथरसचे पोलीस निरिक्षक निपुण अग्रवाल यांच्या टीमचा 25 हजार रुपये रोख रक्कमेचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

व्हॉट्सअप डीपीमुळे अडकले

निपुण अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपीने जो व्हॉट्सअप कॉल केला होता त्यावेळेस एका पोलीस अधिकाऱ्याचा फोटो त्याने डीपी म्हणून ठेवलेला. 12 लाख रुपये आपल्या खात्यांवर ट्रान्सफर करुन घेतल्यानंतर त्याने पुन्हा फोन केला तेव्हा वेगळा डीपी होता. पीडित व्यक्तीने पैसे दिल्यानंतर 2 तासांनी मुलाला फोन केला तेव्हा त्याने कोणताच गुन्हा केला नसल्याचं आणि तो सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. आरोपी यापूर्वीही अनेकदा तुरुंगात जाऊन आले आहेत." वेगवेगळ्या लोकांना वेगवगेळे डीपी ठेऊन हे लोक संपर्क साधायचे. त्यामुळेच पोलिसांना या टोळीवर प्राथमिक संक्षय आला आणि त्यामधूनच पहिली अटक झाली. फारसं शिक्षण नसूनही या तरुणांचे डीपी एवढे आलिशान आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या लूकमध्ये कसे असा प्रश्न पोलिसांना पडला आणि तिथूनच तपासाचे धागेदोरे मिळाले.