लज्जास्पद असा उल्लेख करत एलॉन मस्क कॅनडियन PM ट्रूडोंवर संतापले; म्हणाले, 'ट्रूडो सरकार...'

Elon Musk Angry On Trudeau: मागील काही आठवड्यांपासून भारतावर केलेल्या आरोपांमुळे जस्टिन ट्रूडो चर्चेत असतानाच आता मस्क यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 2, 2023, 11:09 AM IST
लज्जास्पद असा उल्लेख करत एलॉन मस्क कॅनडियन PM ट्रूडोंवर संतापले; म्हणाले, 'ट्रूडो सरकार...' title=
मस्क यांनी ट्वीटरवरुन केली टीका (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्स)

Elon Musk Angry On Trudeau: 'स्पेसएक्स'चे संस्थापक तसेच ट्वीटर म्हणजेच सध्याच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक एलॉन मस्क यांनी कॅनडीयन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर निशाणा साधला आहे. मस्क यांनी ट्रूडो यांच्या सरकारवर अभिव्यक्ति स्वातंत्र्य चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. भारत आणि कॅनडादरम्यान सुरु असलेल्या वादादरम्यान ट्रूडो सरकारने घेतलेल्या एका निर्णयावरुन एलॉन मस्क संतापले आहेत. कॅनडा सरकारने नुकताच ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांबद्दल एक नियम तयार केला आहे. याच नियमाला मस्क यांनी विरोध केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारने नुकताच एक नवीन नियम लागू केला. ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांना देशातील नियामक मंडळाकडे नोंदणी करणं यापुढे अनिवार्य असेल असं सांगण्यात आलं आहे. याच निर्णयावरुन लेखक आणि पत्रकार ग्लेन ग्रीनवॉल्ड यांनी एक ट्वीट केलं. 'कॅनडा सरकारने आता जगातील सर्वाधिक नियंत्रित आणि दबावाखाली असलेली ऑनलाइन सेन्सॉरशीप योजना लागू केली आहे. पॉडकास्ट करणाऱ्या सर्व ऑनलाइन सेवांना सरकारी नियामकांकडे नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे,' असं ग्लेन ग्रीनवॉल्ड म्हणाले.

मस्क काय म्हणाले?

ग्लेन ग्रीनवॉल्ड यांचं ट्वीट कोट करुन त्यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी, "ट्रूडो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत, हे फारच लज्जास्पद आहे," असं म्हटलं आहे. 

यापूर्वीही अनेकदा झालीय टीका

जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पहिल्यांदाच करण्यात आलेला नाही. मागील वर्षी सरकारने कोरोना लसीकरणाला विरोध करणाऱ्या ट्रक चालकांचं आंदोलन चिरडण्यासाठी आपत्कालीन तरतूदींचा वापर केला होता. कॅनडाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपत्कालीन तरतूद वापरण्यात आलेली. यावरुन ट्रूडो सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झालेली.

भारतावर केलेल्या आरोपांमुळे अडचणीत

सध्या जस्टिन ट्रूडो हे त्यांनी भारताविरोधात केलेल्या विधानामुळे चर्चेत आहेत. ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय अधिकारी आणि सूत्रांचा सहभाग असल्याचा आरोप संसदेमध्ये बोलताना केला होता. भारताने यावर प्रत्युत्तर देताना, कॅनडीयन पंतप्रधानांचा आरोप हा पूर्णपणे निराधार आणि विशिष्ट हेतूने करण्यात आल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे आता कॅनडामधील विरोधीपक्षांनी ट्रूडो यांच्यावर या दाव्यानंतर टीकेची झोड उठवली आहे. भारताबरोबर संबंध खराब करुन घेण्यासाठी ट्रूडोच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यातच आता आणखीन एका धोरणावरुन ट्रूडो सरकार टीकेची धनी ठरत असून या सरकारवर टीका करणाऱ्यांमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांचाही समावेश झाला आहे.