तयार व्हा! 15 ऑगस्टला लाँच होतीये 5 डोअर Mahindra Thar; जाणून घ्या काय आहे खास

Mahindra Thar ही त्या सेगमेंटमधील सर्वात प्रसिद्ध SUV पैकी आहे. दरम्यान आता कंपनीने याच्या 5 डोअर व्हर्जनच्या लाँचिगची तयारी केली आहे. ही कार एसयुव्ही सेगमेंटमध्ये Maruti Jimmy ला टक्कर देण्याच्या प्रयत्नात असेल.   

शिवराज यादव | Updated: Jun 26, 2023, 02:31 PM IST
तयार व्हा! 15 ऑगस्टला लाँच होतीये 5 डोअर Mahindra Thar; जाणून घ्या काय आहे खास title=

Mahindra Thar च्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. कंपनी आता लवकरच पाच दरवाजांचं नवं व्हर्जन बाजारात आणणार आहे. कंपनीने भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला ही ऑफरोडिंग 5 डोअर एसयुव्ही लाँच करण्याची तयारी केली आहे. रिपोर्टनुसार, सध्या ही कार फक्त प्रदर्शित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, महिंद्राने 15 ऑगस्ट 2020 रोजी थारच्या लेटेस्ट मॉडेलचं अनावरण केलं होतं. कंपनी या एसयुव्हीला दक्षिण आफ्रिकेतील जागतिक प्रदर्शनात सादर करणार आहे. गतवर्षी हा कार्यक्रम युकेमध्ये पार पडला होता. 

महिंद्रासाठी भारतासह दक्षिण आफ्रिकाही मुख्य बाजारपेठ आहे. कंपनी 1996 पासून दक्षिण आफ्रिकेतील बाजारात गाड्यांची विक्री करत आहे. आगामी काळात अन्य काही मॉडेल ज्याप्रमाणे एक्सयुव्ही 300, एक्सयुव्ही 700 आणि स्कॉर्पिओ-नलाही तेथील बाजारात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतातील ग्राहकांना Mahindra Thar 5-Door साठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

देशभरात महिंद्राच्या गाड्यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. हे चाहते Mahindra Thar 5-Door लाँच होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा Maruti Jimmy च्या 5 डोअर व्हेरियंटला लाँच केलं होतं तेव्हा महिंद्राने Thar 5-Door ची माहिती दिली होती. कंपनीने पुढील वर्षी म्हणजेच 2024 पर्यंत भारतात Mahindra Thar 5-Door ची विक्री सुरु होईल असं जाहीर केलं होतं. 

Mahindra Thar 5-Door मध्ये खास काय?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नावात उल्लेख आहे त्याप्रमाणे या गाडीला 5 दरवाजे असतील. त्यामुळे सध्याच्या SUV च्या तुलनेत यामध्ये बसताना आणि बाहेर पडताना थोडं आरामशीर असणार आहे. तसंच हिचा आकार मोठा आहे. ज्यामुळे केबिनमध्ये फार मोठी स्पेस मिळेल. यामध्ये 5 लोकांच्या बसण्याची सोय असेल. कंपनी 2.2 लीटर डिझेल आणि 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह ही कार आणणार आहे. हेच इंजिन सध्याच्या मॉडेलमध्येही वापरण्यात आलं आहे. 

Mahindra Thar 5-Door मध्ये फक्त अतिरिक्त फिचर्स मिळणार नाहीत. तर उत्तम आणि अॅडव्हान्स फिचर असणार आहेत. यामध्ये सनरुफ असणार असल्याने इतरही चांगल्या फिचर्सची अपेक्षा केली जात आहे. यामध्ये सॉफ्ट-टॉप व्हेरियंट दिलं न जाण्याची शक्यता आहे. Mahindra Thar 5-Door ला फ्रंट सेंट्र आर्मरेस्ट, एक अपडेटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, केबिनमध्ये अधिक स्टोरेज स्पेस, मागील बाजूला दोन स्वतंत्र सीट आणि इंटिरियरला प्रीमियम टच देण्यात आला आहे. 

Mahindra Thar 5-Door थेट मारुत जिम्नीला टक्कर देणार आहे. कंपनीने नुकतंच 12 लाख 74 हजारात तिला लाँच केलं आहे. पण जिम्नी फक्त 1.5 लीट पेट्रोल इंजिनच्या पर्यायात उपलब्ध आहे. पण थारच्या ग्राहकांना अतिरिक्त पर्याय मिळणार आहेत. याशिवाय थारचं इंजिन मोठं आणि दमदार आहे. आता महिंद्रा या कारची किती किंमत ठरवतं हे पाहावं लागणार आहे.